काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यांच्या या विधानावरून विरोधकांकडून भाजपा आणि शिंदे सरकारवर टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारपरिषदेत यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे, देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही. त्यामुळे मी असं मानतो की यावर काही वाद होण्याचं कारण नाही. मला वाटत नाही की राज्यपालांच्या मनातही काही शंका आहे.”
याशिवाय, “राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनात असा कुठलाही भाव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही. असही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.”
हेही वाचा – “छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण…”; खासदार अमोल कोल्हेंचं विधान!
याचबरोबर भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींच्या विधानावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “सुधांशु त्रिवेदींचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही.”