उद्धव ठाकरेंनी बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज म्हणजेच ३० जून रोजी सकाळी ११ वाजता भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. महाराष्ट्र भाजपाच्या या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या ३९ बंडखोर आमदारांच्या गटासोबत जाण्यासंदर्भात आणि सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा विनियम होण्याची शक्यता आहे. या बंडखोर आमदारांसोबत दुपारी दीडच्या सुमारास भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक होण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांचा गट सध्या गोव्यात वास्तव्यास असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक घेतली जाण्याची शक्यात आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार उद्या म्हणजेच १ जुलै रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस १ जूलै रोजी शपथ घेण्यामागे एक विशेष कारण असल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की वाचा >> मध्यरात्री शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात दाखल; महाराष्ट्रात येण्याची घाई न करण्याचा चंद्रकांत पाटलांचा सल्ला, कारण…

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता विरोधी पक्ष नेते असणारे देवेंद्र फडणवीस हे उद्या म्हणजेच शुक्रवारी, १ जुलै रोजी राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या काही महत्वाच्या बैठकी आज पार पडणार आहेत. सायंकाळपर्यंत सत्तास्थापनेसंदर्भातील चित्र अधिस स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे फडणवीस हे उद्या म्हणजेच जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी शपथ घेतील असंही म्हटलं जातंय. भाजपाकडून शपथविधीसंदर्भात एवढ्या वेगाने हलचाली करण्यामागील कारण आहे २ जुलै रोजी हैदराबादमध्ये होणारी राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे या कार्यकारणीची बैठकीला उपस्थित राहणार आहे. मात्र त्यापूर्वीच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. फडणवीस हे या बैठकीला मुख्यमंत्री म्हणूनच हजर राहतील असे भाजपाचे प्रयत्न असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. त्यामुळेच भाजपा आज दिवसभरात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत सत्ता विभाजानाचं सूत्र निश्चित करणार असल्याचं सांगितलं जातंय.

नक्की वाचा >> “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसं फोडणाऱ्या, त्यांच्याविरोधात द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल…”

भाजपा एकनाथ शिंदे गटातील ३९ शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष ९ अशा ४८ आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्न आहे. असं झालं तर एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं. मध्यरात्री सर्व बंडखोर आमदार गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. २२ जून पाहून हे आमदार गुवाहाटीमधील ‘रेडिसन्स ब्लू’ हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. ३० जूनच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर ते काल म्हणजेच २९ जून रोजी गोव्यात दाखल झाले. गोव्याचे मुख्यमंत्री मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास या आमदारांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. सध्या भाजपाकडे १०६ चे संख्याबळ असून ४८ आमदारांच्या मदतीने भाजपाला बहुमताचा १४५ चा आकडा सहज गाठणं शक्य आहे. “एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे,” असं पत्रकारांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने शिंदेच्या समर्थनावरच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या गादीवर बसतील असं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> “आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…”; उद्धव ठाकरेंसाठी दाक्षिणात्य अभिनेत्यानं केलेली पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

“शपथविधी कधी होईल, त्यावर निर्णय व्हायचा आहे. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, जर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती,” असंही चंद्रकांत पाटील बुधवारी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर म्हणाले आहेत.  “सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही,” असं स्पष्ट करताना चंद्रकांत पाटलांनी आज यासंदर्भात चर्चा केली जाईल असे संकेत दिलेत.

एकीकडे भाजपाने सत्तास्थापनेसाठी वेगवान हलचाली सुरु केल्या असल्या तरी दुसरीकडे शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांचा कायदेशीर मुद्दा कायम आहे. सत्ताबदल झाल्यावरही शिवसेना व शिंदे गटात कायदेशीर लढाई कायम राहणार आहे. 

Story img Loader