“राजकारणात एकदा फसलो, गद्दारीमुळे आमचा पराभव झाला पण यापुढे फसणार नाही. समविचारी पक्षांना सोबत घेऊन यापुढची वाटचाल करू राज्याचे राजकारण नव्याने घडवू.” असा आशावाद शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. शेकापच्या आगामी राजकारणाची दिशा काय असेल याचे स्पष्ट संकेत त्यांनी या निमित्ताने दिले. तसेच, वर्षभरात १०० कोटींचा पक्षनिधी गोळा करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

वडखळ येथे झालेल्या या वर्धापनदिन सोहळ्याला आम आदमी पक्षाचे गोपाळ राय, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मिनाक्षी पाटील, धैर्यशील पाटील, सुभाष पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या.

उगवणारा सूर्य हा आपलाच असेल –

तसेच, “यापुर्वीही शेकापसमोर अशी आव्हाने आली. पण प्रत्येक वेळी पक्षाने उभारी घेतली. ७२ साली झालेल्या निवडणुकीत शेकापचा एकच आमदार आला होता. पण ७७ साली शेकापने आपले खासदार आणि आमदार निवडून आणले. ९६ सालीही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ९८ साली शेकापचे रामशेठ ठाकूर खासदार झाले. अंतुलेसारख्या नेत्याचा दोन वेळा पराभव केला. हीच गोष्ट पुन्हा करू शकतो. तुमची साथ हवी. हिंमत हरायची नाही. उद्याचा उगवणारा सूर्य हा आपलाच असेल.” असा आशावाद जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

येत्या वर्षभरात शेकाप स्वतःचा निधी गोळा करणार –

याचबरोबर, “निवडणुका कशा लढल्या जातात हे आता आम्हाला समजले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात शेकाप स्वतःचा निधी गोळा करणार आहे. दहा हजार लोकांकडून १ एक लाख या प्रमाणे पुढील वर्षभरात १०० कोटी गोळा उद्दीष्ट पक्षाने डोळ्यासमोर ठेवले आहे. ५० हजार लोकांना आम्ही नोकऱ्या दिल्या आहेत. ते देखील ५ हजार रुपये तरी देतील. पक्षाकडे जमा होणारा सर्व निधी हा धनादेशाने घेणार आहे. पक्षनिधी उभा करण्याची ताकद शेकापमध्ये आहे.” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यपालांवर टीका केली. राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास कळलाच नसल्याचे ते म्हणाले. तर केंद्र सरकारने पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजप सरकारच्या काळात पिक विमा कंपन्यांना ४० हजार कोटींचा फायदा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

नाहीतर जनसामान्यांचा आवाज शिल्लक राहणार नाही – राजू शेट्टी

उद्योगपती श्रीमंत होत आहेत आणि दुसरीकडे दारिद्र रेषेखालील लोकांची संख्या वाढते आहे. शाळांची अवस्था बिकट आहे. जनसमान्यांचे प्रश्नाकडे लक्ष द्यायला राजकीय पक्षांना वेळ नाही अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळणारा चौपट दर कमी करून दुप्पट करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. चळवळीतल्या पक्षांवर जनतेचा विश्वास आहे. तो टिकवून ठेवायचा असेल शेतकरी कामगार पक्षाला जपायला हवे. नाहीतर जनसामान्यांचा आवाज शिल्लक राहणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

संघटीत व्हा आणि व्यवस्थेच्या विरोधात लढा – गोपाळ राय

आपचे गोपाळ राय यांनी यावेळी भाजपावर जोरदार टीका केली. फोडा आणि राज्य करा ही ब्रिटीशांची निती भाजपाकडून अवंलबली जात आहे. जनसामान्यांचा आवाज दाबला जातो आहे. रुपयाचे अवमुल्यंन सुरु आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे. धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. शेती आणि शेतकरी पुढे जाणार नाही तोवर ही परिस्थिती सुधारणार नाही. देश वाचला तर तुम्ही वाचाल. त्यामुळे संघटीत व्हा आणि व्यवस्थेच्या विरोधात लढा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

Story img Loader