‘येत्या १५ नोव्हेंबरला माझ्या रंगभूमीवरील कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. यादरम्यान मी नाटकाचे प्रयोग, तसेच अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने २०० हून अधिक वेळा बेळगावात आलेले आहे. हे माझे आवडते गाव आहे. या गावाने माझ्या गाण्यावर आणि नाटकावर अतोनात प्रेम केले आहे. त्यामुळे या ठिकाणी मला नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे हा माझ्याकरिता अत्यंत आनंदाचा क्षण आहे. यानिमित्ताने चिंतन करताना मला जाणवलं की, उद्याच्या मराठी रंगभूमीच्या भवितव्यासाठी बालनाटय़ चळवळ पुन्हा एकदा जोमाने फोफावणे गरजेचे आहे. ८ ते १५ हे मुलांचे संस्कारक्षम वय असते. या वयात त्यांच्यावर बालनाटय़ाचे संस्कार जाणीवपूर्वक झाल्यास उद्याच्या रंगभूमीसाठी कलाकार, तंत्रज्ञ आणि जाणकार प्रेक्षक उपलब्ध होऊ शकतील. यासाठी शासनानेही बालनाटय़ांना अनुदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ९५ व्या नाटय़संमेलनाच्या अध्यक्ष फैयाज शेख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
रंगभूमीवरील विविध प्रवाहांचा ऊहापोह करून त्यासंबंधीची निरीक्षणे त्यांनी आपल्या भाषणात मांडली. प्रायोगिक रंगभूमीवर सध्या आशावादी वातावरण असून, अनेक तरुण रंगकर्मी उत्तमोत्तम नाटके त्यावर सादर करीत आहेत, असे त्या म्हणाल्या. निर्माता संघाच्या दीर्घाक स्पर्धेतील उत्तम नाटके त्यात कोणतेही पाणी न घालता जशीच्या तशी व्यावसायिक रंगभूमीवर सादर करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचा सुवर्णमध्य साधणाऱ्या नाटकांची निर्मिती करून ती राष्ट्रीय स्तरावर सादर केली जावीत, अशी इच्छाही त्यांनी प्रकट केली.

मालिका आणि चित्रपटांतील कलावंतांनीही रियाजासाठी एकतरी नाटक अधूनमधून करायला हवे.
– फैयाज, नाटय़संमेलनाध्यक्ष

Story img Loader