लातूरचे महापौर शेख अख्तर जलालसाब मिस्त्री यांनी जातीची बनावट कागदपत्रे जोडून निवडणूक लढविल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार बैठकीत केले.
सावंत म्हणाले, छप्परबंद या जातीचे प्रमाणपत्र महापौर मिस्त्री यांनी २००१ मध्ये मिळविले. २०१२ मध्ये ते प्रमाणपत्र जोडून निवडणूक लढवली व मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या महापौरपदावर ते बसले. त्यांनी यासाठी शाळा सोडल्याच्या दाखल्यापासून अनेक बनावट कागदपत्रे जमा केली आहेत. त्यासाठी अस्तित्वात नसलेल्या शाळेचा दाखला त्यांनी जोडला आहे.
१९८५ साली शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र महापौरांनी ज्या शाळेचे दिले आहे, ती आदर्श प्राथमिक शाळा तेव्हा अस्तित्वातच नव्हती. प्राथमिक शाळेत आठवीचा वर्ग कसा काय होता, असा प्रश्न उपस्थित करून संबंधित शाळेचे संस्थाचालक नगरसेवक राजेंद्र इंद्राळे यांनी आपल्या शाळेस १९९९-२००० या काळात मान्यता मिळाली. त्यापूर्वी शाळाच अस्तित्वात नसल्याचे म्हटले आहे. शाळेची स्थापनाच जून १९९७ ची असल्याचे मुख्याध्यापकांनी लिहून दिले आहे.
महापौरांनी उर्दू शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात आपली जन्मतारीख २१ जुल १९६५ तर आदर्श विद्यालयाच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात १ डिसेंबर १९६६ अशी नोंदवली आहे. हा प्रकार फसवणुकीचा असून या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंद करावा, अशी मागणी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे केली असून गुन्हा नोंद झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
या प्रकरणी महापौर अख्तर मिस्त्री यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्या विरोधात आपल्या हितशत्रूंनी रचलेले हे कुभांड आहे. मी जर कोणती फसवणूक केली असे सिद्ध झाल्यास तातडीने पदाचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा