निवडणुकांसाठी छुप्या पद्धतीने वाटले जाणारे पैसे आणि जुगारासारख्या धंद्यातून बनावट नोटा व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे. सांगली, कोल्हापूर येथे काल रात्री मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून ही माहिती पुढे आली आहे. सांगलीत सापडलेल्या ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटाही या निवडणुकांसाठीच वापरल्या जाणार होत्या.
सांगलीत कालच्या कारवाईत या गुन्ह्य़ातील एक मोठी साखळीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांकडून वरील धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या नोटा तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा जसा प्रसार होत आहे तसाच या नोटा वितरित करण्याची पद्धतीही या गुन्हेगारांनी विकसित केली आहे.
सांगलीत सापडलेल्या ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा या जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वाटल्या जाणार होत्या. हा सर्वच प्रकार बंद दरवाज्याआड सुरू असल्याने अशी नोट दिल्याबद्दल लोकही तक्रार करण्याऐवजी ती नोट व्यवहारात आणण्याचाच प्रयत्न करतात. याशिवाय जुगारासारख्या धंद्यामधूनही या नोटा वितरित होत असल्याचे या आरोपींकडे केलेल्या चौकशीतून पुढे आले आहे. दरम्यान कालच्या कारवाईत चारजणांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ जुलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake note found in sangli