सांगली: बनावट शेती औषधे व किटकनाशकांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना १४ लाखांचा साठा कृषी विभागाच्या पथकाने जप्त करून दोघांना पोलीसांच्या ताब्यात दिले. हैदराबादहून हा बनावट औषधे व कीटकनाशके बसने आणण्यात आली होती. द्राक्षाच्या फळछाटण्या सुरू असून यावेळी कीटकनाशके आणि औषधांची मोठी गरज शेतकर्यांना असते. ही नामी संधी ओळखून हैद्राबादमध्ये तयार करण्यात आलेली शेती औषधे व कीटकनाशके गावपातळीवरील स्थानिक कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांना विक्री करण्याचे नियोजन काही मंडळीकडून होत असते. अशा पध्दतीने बनावट औषधे व कीटकनाशके आष्टानजीक बागणी येथे आणली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे संजय बुवा, संघदिप खिराडे, सतीश पिसाळ आदींच्या पथकाने आष्टा पोलीसांच्या मदतीने छापा टाकला. सुभाष माळी यांच्या घरासमोर मारूती व्हॅन (एमएच ०९ बीबी ९७३९) संशयास्पद उभी होती. या वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये रिडोमील, क्रोबट, लजेट, स्कोअर, कर्झेट ही बुरशीजन्य रोगावर वापरली जाणारी शेती औषधे व कीटकनाशके आढळून आली. या औषध उत्पादनाचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना सोबत नव्हता. ही कृषी औषधे व कीटकनाशके बनावट असून याचा रोग व कीड नियंत्रणासाठी काहीही उपयोग होत नसल्याने शेतकर्यांची आर्थिक लुबाडणूक व फसवणूक करण्याच्या उद्देशानेच ही औषधे विकली जात होती. वाहनातून १४ लाख ४३ हजार ८०० रूपयांची बनावट औषधे व कीटकनाशके जप्त करण्यात आली. या प्रकरणी वाहनचालक शशीकांत थोरात (वय ४५) आणि बजरंग माळी (वय ४२ दोघेही रा.वाळवा) या दोघांना ताब्यात घेउन आष्टा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.