EVM Hacking viral video: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मविआच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका घेण्यास सुरुवात केली आहे. मतमोजणीत अनेक ठिकाणी गोंधळ असल्याची तक्रार उमेदवार करत आहेत. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे ईव्हीएमबाबत अनेक दावे करत आहेत. त्यातच सोशल मीडियावर ईव्हीएम हॅकिंग होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओवर आता निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. तसेच याप्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल केल्याचेही आयोगाने सांगितले आहे.
व्हिडीओ कॉलिंगवर दोन व्यक्ती एका कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. फोन करणारे दोन व्यक्ती १०५ उमेदवारांपैकी ६३ उमेदवारांना जिंकवून देण्याबाबत विचारत आहेत. पण त्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा क्रमांक लागेल असे कथित हॅकर सांगतो. तसेच २८८ मतदारसंघापैकी २८१ ठिकाणी आम्हाला ईव्हीएमचा ॲक्सेस आहे, असेही हॅकर सांगतो. हॅकिंगसाठी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी हायस्पीड इंटरनेट कनेक्शन आणि फिल्डवर काही माणसे लागतील, असेही हॅकर त्यांना सांगतो.
उमेदवारांकडून कोणती माहिती आवश्यक आहे, हेही हॅकर सांगत आहे. तसेच ईव्हीएम मशीन बंद असतानाही त्यावर ट्रान्समिशन होते आणि व्हीव्हीपॅट मशीनला आधीच हॅक करतो, असेही हॅकर सांगतो. सहा मिनिटे ५५ सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अतिशय शांतपणे आणि तांत्रिक बाजू सांगत हॅकर ईव्हीएमच्या हॅकिंगची माहिती देत आहे. त्यामुळे या व्हिडीओतील कथित संभाषण हे खरे असल्याचा अनेकांचा समज झाला. त्यातून निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका झाली.
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने याबाबत एक्सवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिले आहे. “व्हिडीओमधील व्यक्ती ईव्हीएम हॅकिंगबाबत निराधार, धादांत खोटा आणि बिनबुडाचा दावा करत आहे. ईव्हीएम हॅक करता येत नाहीत. तसेच ती कोणत्याही फ्रिक्वेन्सीशी जोडले जाऊ शकत नाहीत. व्हिडीओमधील सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
मुंबई सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८/४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ४३ (ग) आणि कलम ६६ (घ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे कथित हॅकर?
व्हिडीओ कॉलिंगमध्ये हॅकिंगची माहिती देत असलेल्या व्यक्तीचे नाव सय्यद सुजा असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. ईव्हीएम विकसित करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL) या कंपनीत त्याने २००९ ते २०१४ या काळात काम केल्याचे सांगितले जाते. तसेच तो स्वतःला सायबर तज्ज्ञ म्हणवून घेतो. ECIL आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन सार्वजनिक मालकिच्या कंपन्यांकडून निवडणूक आयोगासाठी ईव्हीएमची निर्मिती केली जाते.
२०१८ साली सय्यद सुजाला अमेरिकेत आश्रय मिळाल्याचा दावा केला जातो. मात्र तो सध्या नेमका कोणत्या देशात आहे किंवा तो करत असलेल्या दाव्यांमध्ये नेमके तथ्य किती? याबाबत काहीही पक्की माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
याआधी २१ जानेवारी २०१९ रोजी सुजाने लंडन येथे पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम हॅकिंगबाबत माहिती दिली होती. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे एक माजी नेतेही उपस्थित होते.