Deenanath Mangeshkar Hospital: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि गर्भवती महिलेच्या मृत्यूचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. दीनानाथ रुग्णालयाने आगाऊ रक्कम न भरल्यामुळे पीडितेला दाखल करुन घेण्यास आणि उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप, पीडित महिलेल्या कुटुंबीयांनी केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर रुग्णालयाबाबत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. अशात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.
आज पुणे येथे एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित महिलेचे पती, नणंद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली. यावेळी पीडित कुटुंबीयांसोबत भाजपाचे आमदार अमित गोरखे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिले आहे.
मुख्यमंत्र्यांचे शब्द
यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणातील पीडित तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांची आज पुणे येथे भेट घेतली. यावेळी भिसे कुटुंबियांचे सांत्वन केले व या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचा शब्द दिला. तसेच भविष्यात अशी प्रकरणे होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने एसओपी तयार करणार आहे.
पीडितेचे कुटुंबीय काय म्हणाले?
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पीडित तनिषा भिसे यांच्या नणंद म्हणाल्या की, “डॉक्टर घैसास यांचा परवाणा रद्द करावा. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो असून, त्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.”
सगळी चूक हॉस्पिटलची…
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबीयांनी खूप मेहनतीतून उभारले आहे. हे नावाजलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयात अनेक प्रकारचे उपचार आणि शस्त्रक्रिया होतात. सगळी काही हॉस्पिटलची चूक आहे असे म्हणण्याचे कारण नाही. मात्र, कालचा प्रकार असंवेदनशीलच होता. जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावे लागेल ती चूक सुधारावी लागेल जर ते चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे.”