राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या ३७ वर पोहचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबईमध्ये तीन तर नवी मुंबईमध्ये एक नवीन रुग्ण अढळून आल्याने रविवारी ३३ असणारी संख्या सोमवारी ३७ वर पोहचली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने शुक्रवारी पाच प्रमुख शहरांमधील तरणतलाव, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाटकगृहे, मॉल बंद ठेवण्याची आदेश जारी केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी होणारे सर्व कार्यक्रम, सभा रद्द करण्याचेही आदेश दिले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत हद्दीतील शिक्षण संस्थांना सुट्टी देण्याचे आदेश शासनाने शनिवारी दिले. एकीकडे करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे करोनाचा फटका लग्नसंमारंभांनाही बसल्याचे चित्र दिसत आहे. मात्र बीडमधील एका जोडप्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर एक आगळावेगळा समाजहिताचा निर्णय घेतला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

बीडमधील वडवणी येथे राहणाऱ्या मयूर आंधळे याचा रविवारी (१५ मार्च रोजी) साखरपुडा होता. मात्र करोनामुळे सरकारने गर्दी जमेल असे कार्यक्रम आणि लग्न समारंभ पुढे ढकलण्यास सांगितले आहेत. त्यामुळेच आंधळे कुटुंबाने साखरपुडा सोहळ्यातच लग्न उरकून घेतलं. लग्न समारंभाला होणारी अपेक्षित गर्दी टाळण्यासाठी आंधळे कुटुंबाने हा निर्णय घेतला. तसेच लग्नसमारंभामध्ये खर्च होणारा निधी आंधळे कुटुंबिय करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. आज म्हणजे सोमवारी आंधळे कुटुंबिय एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.

वाशिममध्येही काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला. येथील किनखेडामधील शुभम देखमुख आणि यवतमाळमधील तिवरंगमधील दिपाली कदम यांचा १४ मे रोजी विवाह होणार होता. मात्र ८ मार्च रोजी यवतमाळमधील पुसद येथे पार पडलेल्या साखरपुडा सोहळ्यात दोघांनी लग्न उरकून घेतलं.

Story img Loader