स्वातंत्र्योत्तर काळात अगदी सुरुवातीपासून लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी प्रयत्न होत राहिले असले तरीही आजही देशातील ग्रामीण भागातील समाजात ‘मुलगाच हवा’ ही भावना कायम राहिली आहे. ही बाब लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी अपेक्षित यश मिळविण्यात अडथळा आणणारी आहे.
यापुढे लोकसंख्येच्या स्थिरीकरणासाठी लैंगिक शिक्षणास व महिलांच्या सक्षमीकरणास प्राधान्य देण्याची गरज असल्याचा सूर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाने नवी दिल्लीतील संसद भवनात आयोजिलेल्या ‘पार्लमेंटरियन्स मिट’ कार्यक्रमात निघाला.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीएआय) व इंटरनॅशनल पॅरेंटहूड फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंख्या, विकास व पुनरुत्पादक आरोग्य’ या विषयावर खासदारांशी खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती.
या चर्चेत फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर (सोलापूर) यांचाही सहभाग होता.
या चर्चासत्रातील कामकाजाची माहिती देताना प्रा. डॉ. येळेगावकर म्हणाले, लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत, लोकसहभागातून कुटुंबनियोजनाची चळवळ वाढीस लागावी, या हेतूने खासदारांसाठी हे चर्चासत्र आयोजिले होते. यात डॉ. किरीट सोळंखी (गुजरात), अनंतकुमार हेगडे (कर्नाटक), विप्लव ठाकूर (हिमाचल प्रदेश), डॉ. विजयालक्ष्मी सौदा (मध्य प्रदेश), जुगलकिशोर शर्मा (जम्मू काश्मीर), ए. बी. रोपालू (तेलंगणा) आदी बारा खासदारांनी सहभाग नोंदविला होता. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश आराध्ये, उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्यासह इंटरनॅशनल पॅरेंटहूड फेडरेशनच्या विभागीय संचालिका अंजली सेन, डॉ. कल्पना आपटे, अपराजिता गोगोई, सुजाता नटराजन, ललित पराशर, डॉ. शिरीष माल्डे आदींनी विविध मुद्यांवर चर्चा उपस्थित करून खासदारांचे लक्ष वेधले.

Story img Loader