पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘संगीताला धर्म नसतो’, हे संगीतावरच्या कोणत्याही भावुक हिंदी चित्रपटातील नायक-नायिकेचे गुळगुळीत वाक्य प्रत्येक धर्म, पंथांची भिन्न शैलीतील स्वरआवळण ऐकल्यानंतर खोटे वाटायला लागते. त्यात भारतातील एकाच धर्माचे तेहतीस किंवा छत्तीस कोटी देव धरले, तर त्यांच्यावर आधारलेल्या गाण्यांची संख्या किती आहे, हे स्पष्ट होईल. याशिवाय देवासमान असलेल्या भक्तांवरची, संतांवरची गाणी हा आकडा नक्कीच आणखी वाढवू शकतील. मग त्यात धार्मिक चित्रगीतांचाही समावेश केल्यास भारत हा भक्तिरसस्वरांचा महासागर असल्याची प्रचिती येईल.

यातल्या वैचारिक गमतीचा भाग सोडला, तरी जगाच्या ज्या कानाकोपऱ्यात धर्म, पंथ अस्तित्वात आहे, तेथे शेकडो वर्षांपासून भक्ती संगीत तयार झाले आहे. पिढय़ान्पिढय़ा त्याचे वेगवेगळ्या स्वरूपात रूपांतर झाले आहे. हिंदी चित्रपटांमध्ये प्रीतिगीतांनंतर भक्ती संगीताचा क्रमांक लागतो. देवाला आपल्या दु:खस्थितीचे वर्णन करणारे ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ असो किंवा ‘तीन-चार दशके अविरत आरती उतरवली जाणारे ‘संतोषी माता की..’ हे गाणे असो. भारतातील प्रेक्षक आणि श्रोत्यांचा धर्मपगडा इतका आहे, की कोणत्याही कवी-संगीतकाराला देवाला डावलून जाता आले नाही. अगदी डिस्को प्रसार करणाऱ्या बप्पी लाहिरीलाही ‘कृष्णा धरती पे आजा तू’ हे आळवावे लागले आहे. पॉप संगीताच्या आरंभी ‘कलोनियल कझिन’ या बॅण्डचे कृष्णावरचे हिंग्लिश गाणे खूप गाजले, तर लकी अलीच्या ‘सुनो’मधील ‘तुमही से पहले’ हे गाणे त्यातल्या अफलातून वाद्यावळ रचनेमुळे वेगळे ठरले. भारतीय चित्रपट संगीतामध्ये काही काळ सुफीग्रस्त झाले, तेव्हा ‘नैन’ या शब्दाइतकेच ‘मौला, खुदा’ हेदेखील गाण्यांतील परवलीचे शब्द बनले होते.

आंग्ल-संगीत जगतात ‘गॉस्पेल म्युझिक’ ही स्वतंत्र शाखाच मानली जाते आणि बिलबोर्ड म्युझिक चार्टमध्ये त्याच्या टॉप-१० गाण्यांची यादी दर आठवडय़ाला सादर केली जाते. ग्रॅमी पुरस्कारांमध्येही या संगीताचा एक स्वतंत्र गट अस्तित्वात असतो. गॉस्पेल म्युझिकचा आरंभ चर्चमध्ये झाला. देवस्तुती करणाऱ्या या गाण्यांचे मूळ सतराव्या शतकापर्यंत जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात देवाची आळवणी आत्यंतिक झाल्यानंतर रेडिओवर या संगीताचा वापर मोठय़ा प्रमाणावर झाला. युद्धाने पोळलेल्या, नैराश्याने ग्रासलेल्या नागरिकांच्या मनाची उभारी साधण्यासाठी या संगीताचा वापर झाला. जॅझ, ब्लू, रॉक आणि कण्ट्री संगीतातील सर्वच कलाकारांनी भक्तिमार्गाचा अवलंब केला. एलविस प्रेस्ले, बिटल्स यांनीही आपल्या काही गाण्यांना भक्तीसाज चढविला.

‘आय कॅन ओन्ली इमॅजिन’ हे मर्सिमी नावाच्या अमेरिकी बॅण्डने गायलेले गाणे गॉस्पेल संगीतातील सर्वाधिक खपाचे आणि लोकप्रिय गाणे मानले जाते. बर्ट मिलार्ड या गीतकाराने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर दु:खाच्या आवेगात लिहिलेले हे गाणे ऐतिहासिक विक्रमाचे ठरले. या गाण्याचा विकास आणि गॉस्पेल संगीताची शाखा समजवून सांगणारा त्याच नावाचा चित्रपट काही महिन्यांपूर्वी आला आहे. दोन वर्षांपूर्वी गाण्यांसाठी साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या बॉब डिलन यांनी अठराव्या शतकातील  ‘पास मी नॉट’ या गीताचे पुनरुज्जीवन केले. चाहत्यांनी डिलनच्या इतर अनेक गाण्यांना लोकप्रिय म्हणून ठरविले असले, तरी हे कव्हर व्हर्शनही त्याच्या खास गळ्यासाठी ऐकायला हवे.

जॉनी कॅश हा कण्ट्री संगीतातील नररत्न समजला जातो. अत्यंत गरिबीतून आलेल्या या कलाकाराने श्रीमंतीचे सारे रंग संगीताच्या बळावर पाहिले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पौगंडावस्थेत शेतकामे करताना हा गायक रेडिओवरील गॉस्पेल संगीतावर वाढल्याचे त्याने अनेक मुलाखतींमध्ये म्हटले आहे. पुढे लोकप्रिय वगैरे झाल्यावर आणि उतारवय आल्यावर त्याचे कण्ट्रीसंगीत भक्तिरसाचा शोध घेऊ लागले. ‘माय गॉड इज रिअल’ हे त्याचे गाणे त्याच काळातील. कोसॉय सिस्टर्सचे ‘आय विल फ्लायअवे’ हे गाणे एकोणिसशे पन्नासच्या काळात गाजलेले गॉस्पेलगीत होते. कोएन ब्रदर्स यांच्या ‘ओ ब्रदर, व्हेअर आर यू’ या चित्रपटात त्याचा वापर झाल्यानंतर पुन्हा या गाण्याची लोकप्रियता वाढली. कर्क फ्रॅन्कलिन यांच्या ‘वॉना बी हॅपी’ हे गाणे जगातील कोणत्याही व्यक्तीचे गाणे बनू शकते.

या आठवडय़ात बिलबोर्ड यादीत कोर्यन हॉथ्रॉन या गायिकेचे ‘वोण्ट ही डू इट’ हे गॉस्पेलगीत पहिल्या स्थानी आहे. यादीतील गाणी ऐकलीत तर आपल्याकडे भक्ती संगीतात मृदंग-तबला-पेटी आणि पारंपरिक वाद्यांवर केलेला देवाचा धावाच वेगळ्या संस्कृतीत कसा केला जातो, याची ओळख होईल. संगीत हाच धर्म असल्याची शिकवण चहूबाजूंनी होत असतानाही त्यावर वादंग उभा करणाऱ्या या देशात तरी ते आवश्यक आहे.

म्युझिक बॉक्स

MercyMe – I Can Only Imagine

Bob Dylan – Pass Me Not, O Gentle Savior

Johnny Cash – My God Is Real

The Kossoy Sisters – I’ll Fly Awayl

Kirk Franklin – Wanna Be Happy

Aretha Franklin – There Is A Fountain Filled With Bloodl

Koryn Hawthorne – Won’t He Do It

viva@expressindia.com

Web Title: Famous english songs popular pop songs best hollywood undead songs