मुंबई : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या ‘फॅनी’ चक्रीवादळाचा तडाखा ओसरल्यावर महाराष्ट्रातील तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
फॅनी चक्रीवादळामुळे तयार झालेल्या ढगांच्या पसाऱ्यामुळे (क्लाऊड बॅण्ड) वायव्येकडून येणाऱ्या उष्ण लहरींना अटकाव झाला आहे. परिणामी, महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंशाने घट नोंदविण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणदेखील आहे. सध्या फॅनी चक्रीवादळ नैर्ऋत्येकडे सरकले असून त्याची तीव्रता कमी होत आहे. फॅनी चक्रीवादळ पूर्णपणे क्षीण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील तापमानातील बदल तसाच राहील, असे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पुढील दोन दिवसांत पुन्हा तापमानात वाढ होऊ शकते.
अरबी समुद्रात वादळाची शक्यता नाही
एप्रिल आणि मे या दोन मान्सूनपूर्व महिन्यात बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होऊन वादळं येण्याची शक्यता असते. पूर्व किनाऱ्यावर अशा वादळांची शक्यता अधिक असते. मात्र सध्या अरबी समुद्रात अशा वादळाची शक्यता नसल्याचे हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.