पूर्तीकडून येथील शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणात आता थेट नितीन गडकरींवर आरोप होऊ लागताच पूर्ती समूहाने या फसवणुकीला तेव्हाचे तांत्रिक सदस्य चंद्रशेखर भागवत हेच जबाबदार असल्याचे सांगत हात झटकले आहेत. आता काँग्रेसच्या नेत्यांनी सध्या ठावठिकाणा लागत नसलेल्या या भागवतांचा शोध घेणे सुरू केले आहे. त्यांना समोर आणून गडकरींना आणखी अडचणीत आणण्याचे डावपेच त्यामागे आहेत.

या जिल्हय़ातील सावली तालुक्यातील उसेगाव येथील २३ शेतकऱ्यांनी त्यांच्या सहकारी संस्थेमार्फत उसाची लागवड करावी यासाठी पूर्तीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मध्यस्थीने एक त्रीपक्षीय करार केला होता. १३ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. या करारानुसार शेतकऱ्यांना बँकेने २६ लाख २६ हजाराचे कर्ज उपलब्ध करून दिले. राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब वासाडे तेव्हा बँकेचे अध्यक्ष होते. या शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी सत्यम इंजिनिअरींग या सल्लागार संस्थेवर टाकण्यात आली. या संस्थेचे प्रमुख चंद्रशेखर भागवत होते. नंतर हेच भागवत पूर्ती समूहातील पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेचे तांत्रिक सदस्य झाले. या भागवतांनी शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेल्या कर्जाची उचल परस्पर केली. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांच्या शेतात उसाची लागवड झालीच नाही. या शेतकऱ्यांच्या नावे असलेले कर्ज मात्र अजूनही थकीत असून आता कर्जाचा हा आकडा २ कोटी ५० लाखावर गेला आहे. गेल्या १० वर्षांपासून या फसवणुकीच्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून वणवण भटकणाऱ्या या शेतकऱ्यांनी गडकरींसकट सर्वच नेत्यांच्या भेटी घेतल्या. २००६ मध्ये हे प्रकरण विधान परिषदेत सुद्धा गाजले. या शेतकऱ्यांनी १३ जुलै २००३ ला या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे सुद्धा केली होती. मात्र, कुणीही त्यांना मदत केली नाही.
आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीन गडकरी यांच्यावर नव्याने आरोप होऊ लागताच काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकरणाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहे. दोन दिवसापूर्वी या शेतकऱ्यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यामुळे अस्वस्थ झालेल्या पूर्ती समूहाने तेव्हा झालेल्या या घोटाळय़ाची सर्व जबाबदारी चंद्रशेखर भागवत यांच्यावर ढकलली आहे. यासंदर्भात आता पूर्ती समूहात सक्रिय असलेले वध्र्याचे माधव कोटस्थाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भागवत यांनीच या कर्जाची उचल परस्पर बँकेतून केली. सत्यम इंजिनिअरींगचे प्रमुख असलेले भागवत यांना पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेने तांत्रिक सदस्यपद बहाल केले होते. मात्र, त्यांनी कर्जाची रक्कम वापरण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना संस्थेतून काढून टाकण्यात आले होते, असे कोटस्थाने यांचे म्हणणे आहे. सहकारी बँकेने भागवत यांना शेतकऱ्यांच्या कर्जाची परस्पर उचल कशी करू दिली? असा सवाल कोटस्थाने यांनी उपस्थित केला. या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर पूर्तीने शेतकऱ्यांच्या संस्थेला विविध योजनांच्या माध्यमातून लाखोचे अनुदान मिळवून दिले असा दावा त्यांनी केला. भागवत गेल्या सात वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या पुण्याच्या पत्त्यावर पाठवण्यात आलेल्या पत्रांना सुद्धा उत्तरे मिळत नाहीत, असे कोटस्थाने म्हणाले. या दाव्यामुळे या फसवणुकीच्या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे.
पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेच्या कागदपत्रांवर भागवत यांचे नाव तांत्रिक सदस्य म्हणून टाकण्यात आले आहे. त्यांच्या नावाखाली असलेला दूरध्वनी क्रमांक कोटस्थाने यांचा आहे. त्यामुळे या प्रकरणात भागवत यांना येथील जिल्हा बँकेने सहभागी करून घेतले की पूर्तीने असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. बँकेतील अधिकारी मात्र हा कर्जाचा व्यवहार उभा करण्यासाठी पूर्ती व भागवत एकत्र बँकेत आले होते असे आता सांगतात. त्यामुळे भागवत आता नेमके कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कर्जाची रक्कम परस्पर खर्च केल्यानंतर भागवत जाणीवपूर्वक बेपत्ता झाले की त्यांना बेपत्ता करण्यात आले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. हे लक्षात आल्याबरोबर आता गडकरींना अडचणीत आणू पाहणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी या भागवतांचा शोध घेणे सुरू केले आहे. हे प्रकरण उचलून धरणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सूचनेवरून ही शोधाशोध सुरू झाली आहे.

Story img Loader