सोलापूर जिल्ह्य़ात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून बार्शी, माढा व पंढरपुरात पुन्हा गारपीट झाल्यामुळे यंदाच्या रब्बी  हंगामातील उरली सुरली पिके पूर्णत: नष्ट होऊन बळीराजा पुरता ‘गार’ झाला आहे. रविवारी सायंकाळी पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे एका शाळेच्या छतावरील पन्हाळी पत्रे उडून अंगावर पडल्याने त्याच शाळेचा लिपीक मृत्युमुखी पडला. काही भागात वीज कोसळण्याच्या पाच घटना घडल्या. सुदैवाने त्यात मनुष्यहानी झाली नसली तरी पाच जनावरे दगावली.
मोहोळ तालुक्यातील औेढी येथे लोकनेते बाबूराव पाटील विद्यालयाच्या इमारतीवर पन्हाळी पत्रे घालण्याचे काम सुरू होते. परंतु वादळी वाऱ्यांसह पडलेल्या अवकाळी पावसात शाळेवरील पन्हाळी पत्रे उडाले. या दुर्घटनेत याच शाळेतील लिपीक धन्यकुमार बब्रुवान रणदिवे (३५, रा. अंकोली, ता. मोहोळ) यांचा मृत्यू झाला. तर प्रा. मंगेश दत्तात्रेय जाधव (२२, रा. पाटकूल, ता. मोहोळ) व पन्हाळी पत्रे घालण्याचे काम करणारे कोमल किसन कांबळे (२७) व सद्दूल पांडुरंग निंबाळकर (२५, रा. पाटकूल) हे कामगार जखमी झाले.
माळशिरसचा अपवाद वगळता शहर व जिल्ह्य़ात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान प्रचंड मोठे असून जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ४० हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे केले आहेत. जिल्ह्य़ात गेल्या २६ फेब्रुवारीपासून चार ते पाच वेळा झालेला एकूण पाऊस तब्बल दोन हजार ६६७ मिमी एवढा असून त्याची सरासरी २९.३२ मिमी आहे. काल शनिवारी सायंकाळी बहुतांश भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. एकाच दिवशी माढा तालुक्यात तब्बल २०८ मिलिमीटर अवकाळी पाऊस झाला. कुर्डूवाडी परिसरातही मुसळधार पाऊस बरसला. बऱ्याच ठिकाणी गारपीट होऊन पिकांचे नुकसान झाले. तर बार्शी तालुक्यात एकाच दिवशी पडलेला पाऊस १५४.१० मिमी इतका होता. या तालुक्यात सलग चौथ्यांदा गारपीट झाली. तसेच पंढरपुरातही गारपिटांसह ६३.९५ मिमी अवकाळी पाऊस पडल्यामुळे तेथील द्राक्ष, लिंबू, डाळिंब इत्यादी बागांसह ऊस, गहू, ज्वारी,मका आदी पिकांचे उरले सुरले अस्तित्वही नष्ट झाले.
अक्कलकोट तालुक्यात १४७ मिमी पाऊस पडत असताना याच तालुक्यातील दुधनी येथील मातोश्री साखर कारखान्याचे मोठे नुकसान झाले. मोहोळ तालुक्यातही अवकाळी पावसाने थैमान घातले असून या भागात एकाच दिवशी १२९.४० मिमी पाऊस पडला. तर दक्षिण सोलापुरात ८३.४० तर उत्तर सोलापुरात ४९.४० मिमी अवकाळी पाऊस बरसला. सांगोला तालुक्यात ३५ मिमी तर मंगळवेढा तालुक्यात ४६.२० मिमी अवकाळी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अवकाळी पाऊस पडत असताना काही तालुक्यांमध्ये विजा कोसळण्याचे प्रकार घडले. मात्र यापैकी एकाही घटनेत मनुष्यहानी झाली नसली तरी गाय, बैल,म्हैस अशी पाच जनावरे दगावली. बार्शी तालुक्यातील धामणगाव व पिंपळगाव तर सांगोला तालुक्यातील जवळा व वाणी चिंचाळे येथे वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच रुंदेवाडी (ता. माढा) येथेही वीज कोसळून एका जनावराचा मृत्यू झाला.
कोल्हापुरात गारांसह पाऊस
प्रतिनिधी, कोल्हापूर
सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. गारांसह पाऊस आल्याने रविवारची सुट्टी आनंदात साजरी करण्याच्या प्रयत्नावर पाणी फिरल्याने अनेकजण हिरमुसले.
गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात तिसऱ्यांदा पावसाने हजेरी लावली आहे. काल शनिवारी पावसाचे आगमन झाल्यावर अर्धातास चांगली वृष्टी झाली होती. दुपारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास आकाशात ढग दाटून येऊन अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरू झाली. अर्धा तास सरी कोसळत राहिल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
सांगलीत पावसाने झोडपले; अर्धा तास गारांचा वर्षांव
वार्ताहर, सांगली
सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील मांजर्डे परिसरात रविवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने २५ घरे पडली असून वाऱ्याने उडालेला पत्रा लागून एक तरुण जखमी झाला आहे. मांजर्डे, गौरगाव, हातनूर या तासगाव तालुक्यातील गावांसह भाळवणी, आळसंद (ता. विटा), गळवेवाडी (ता. आटपाडी) या ठिकाणी अर्धा तास गारांचा वर्षांव झाला. करंजी (ता. विटा) या ठिकाणी एक एकर द्राक्ष बाग रविवारच्या पावसात भुईसपाट झाली.
आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मांजर्डे, गौरगाव, हातनूर या परिसरात वादळ-वाऱ्यासह गारपीट करीत आलेल्या अवकाळी पावसाने अर्धा तास झोडपले. मांजर्डे येथील मदने वस्तीवर जोरदार वाऱ्याने घराचा पत्रा उडून लागल्याने िपटू अर्जुन मदने (वय २०) हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी मांजर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल कण्यात आले आहे. मदने वस्तीवरील संभाजी मदने, भीमराव मदने यांच्यासह २५ घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एका घराची भिंत पडून लोचना जनार्दन जाधव (वय ४०, रा. दहीवडी, ता.तासगाव) ही महिला मृत्युमुखी पडली तर घराचे पत्रे उडून जाणे, िभती पडणे, गारपिटीने कौले फुटणे, जोरदार वाऱ्याने छपरे उडून जाणे आदी प्रकार या वस्तीवर घडले आहेत.
अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, डािळब या फळपिकांसह मागास रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे मोठय़ा प्रमाणात पुन्हा नुकसान झाले आहे. या आठवडय़ात तासगाव परिसरात तिसऱ्यांदा गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. विटा शहरासह भाळवणी, आळसंद परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली असली तरी मागील गारपिटीमुळे नुकसान झाल्याने यावेळी नुकसान होण्यासारखे शेतात पिकच उरलेले नाही. करंजी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने १ एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली.
आटपाडी, खरसुंडी या ठिकाणीही दुपारी १५ ते २० मिनिटे पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील गळवेवाडी येथे गारपिटीमुळे डािळब पिकाचे नुकसान झाले आहे. डािळबासाठी फुलकळी अवस्थेत असणाऱ्या पिकाबरोबरच पक्व तेच्या टप्यावर असणाऱ्या बागांचे गारपिटीने नुकसान झाले आहे.
सांगली शहरातही दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहराच्या सखल भागात पाणी साचले होते. सकाळपासूनच्या उष्म्यानंतर पावसाने जोरदार वृष्टी केल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. जत तालुक्यात सिद्धनाथ, दरीबडची, दरी कोन्नूर परिसरात आज दुपारी झालेल्या पावसाने २५ एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा