सोलापूर : पाचशे रुपयांची पाणीपट्टी थकल्याने शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने चढविलेला बोजा दंडासह संपूर्ण पाणीपट्टीची रक्कम भरुनदेखील सातबारा उताऱ्यावरील सरकारने बोजा कमी केला नाही. त्यामुळे मन:स्ताप होऊन एका वयोवृध्द शेतक ऱ्याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या त्या दुर्दैवी  मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई जोपर्यत होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. तर याच प्रश्नावर प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन हाती घेतले होते.

सिध्दप्पा महारप्पा विभूते (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या वृध्द शेतक ऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात विभूते कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सिध्दप्पा विभूते यांची मुस्ती गावात शेती आहे.

३५ वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ साली त्यांच्याकडे पाचशे रुपयाची पाणीपट्टी थकल्यामुळे महसूल प्रशासनाने त्यांच्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविला होता. परंतु नंतर विभूते यांनी थकीत पाणीपट्टीची रक्कम पाच हजार रुपये दंडासह भरली होती.

त्यामुळे आपल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील शासनाचा बोजा कमी व्हावा म्हणून विभूते हे तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकडे खेटे घालत होते.

परंतु सातबारा उताऱ्यावरील शासनाचा बोजा कमी केला जात नव्हता. त्यासाठी त्यांनी तहसीलदारांकडेही दाद मागितली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विभूते यांनी आत्महत्या केली. वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे.