यवतमाळ : मारेगाव तालुक्यात भाऊबिजेच्या पूर्वसंध्येला एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून मृत्यूला कवटाळले. विष प्राशन केल्यानंतर मृत्यूपूर्वी तो आपल्या मुलांशी व्हीडिओ कॉलवर अखेरचा बोलला आणि त्याने जीव सोडला. सचिन विठ्ठल ढोरे (३७, रा. चोपण) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा >>> दिवाळीतही राज्यात विजेची मागणी १८ हजार मेगावॅटहून कमी ; तापमान घसरल्याचा परिणाम
तालुक्यातील म्हैसदोडका येथील एका सालदाराने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्यानंतर पूर्वसंध्येला शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. दिवाळी सणादरम्यान झालेल्या दोन आत्महत्यांनी मारेगाव तालुका हादरला आहे. सचिन ढोरे याच्याकडे पाच एकरपेक्षा कमी शेती आहे. यावरच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. यावर्षी अतिवृष्टीने पीक मातीमोल झालेत. ही विवंचना त्याला अस्वस्थ करत होती. दिवाळी आली तरी शासनाची मदत पदरी पडली नसल्याने सचिन खचला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. मंगळवारी तो शेतात गेला. सायंकाळी विष प्राशन केल्यानंतर त्याने पत्नीस व्हीडिओ कॉल केला. मला मुलांशी अखेरचे बोलायचे आहे, त्यांचा चेहरा बघायचा आहे, असे त्याने सांगितले. त्याच्या या वक्तव्याने पत्नी काही क्षण हादरली. मात्र तो चेष्टा करत असावा, असे समजून दूरध्वनी मुलांकडे दिला. सचिनने मुलाशी बोलून दूरध्वनी बंद केला. त्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, जंगलात सचिनचा मृतदेह आढळला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.