लोकसत्ता प्रतिनिधी
अहिल्यानगर : बिबट्याच्या हल्ल्यात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात आज, सोमवारी घडली. शोभाचंद सिताराम गव्हाणे उर्फ बोजी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाने परिसरात टॅब कॅमेरे बसवले असून दोन-तीन दिवसातच बिबट्या कायमस्वरूपी बंदिस्त करू, असे आश्वासन वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिले तर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बिबट्या त्वरित बंदिस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात ८ जण ठार झाले आहेत.
शोभाचंद गव्हाणे हे मक्याच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात गव्हाणे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेतात गेलेले पती का परतले नाहीत हे पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी गेल्या असता रस्त्यात त्यांची टोपी आढळली. पुढे गेल्यावर शेताच्या बांध्यावर बांधावर शोभाचंद पडलेले आढळले. पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर परिसरातील लोक धावून आले.
त्यांना शोभाचंद यांचे शीर बाजूला पडलेले आढळले तर पोट फाडलेले होते. घटनास्थळी वनाधिकारी युवराज पाचरणे, पोलीस निरीक्षक संजय ठंगे यांनी धाव घेतली. पोलीस व वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. भीतीमुळे ग्रामस्थांनी वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले की नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जात आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके रवाना झाली आहेत. या भागात त्या कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बिबट्या पकडल्यानंतर त्याला कायमस्वरूपी बंदिस्त केले जाईल. त्यासाठी दोन-तीन दिवसाचा कालावधी लागेल.
यावेळी त्यांनी वनविभागाच्या वतीने मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तात्काळ २५ लाख रुपयांची मदत दोन-तीन दिवसात नातेवाईकांकडे संपूर्ण केली जाईल, असे सांगितले. माजी आमदार तनपुरे यांनी केलेल्या मागणीनुसार ५० पिंजरे उपलब्ध करून दिले जातील. बिबट्याबाबत वनविभाग जनजागृती मोहीम राबवत आहे. काही तक्रार असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यात बिबट्या सोडा
माहिती मिळताच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील त्याचा वावर वाढला आहे. आपण आमदार असताना अनेकवेळा विधानसभेत आवाज उठवला, परंतु राज्य व केंद्र सरकारचे लक्ष नाही. वनविभागाने तात्काळ ५० पिंजरे बसवावेत, आश्वासनाप्रमाणे दोन दिवसात बिबट्या बंदिस्त न झाल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात येऊन परिस्थितीचा अनुभव घ्यावा. वन विभागाने पकडलेले बिबटे जंगलात न सोडता थेट मंत्र्यांच्या बंगल्यात सोडावेत.
बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षात ८ ठार
ऊस तोडणी झाल्यामुळे अधिवास धोक्यात येऊन जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या दोन वर्षात ७ जण ठार झाले. आज राहुरी येथील घटना लक्षात घेता ही संख्या ८ झाली आहे. याशिवाय ८३ जण जखमी झाले आहेत तर ७१५५ जनावरांचा बिबट्याने दोन वर्षात फडशा पाडला आहे. त्यामुळे वन विभागाला एकूण ८ कोटी ६७ लाख १५ हजार १३९ रुपयांची भरपाई द्यावी लागली आहे.