हिंगोली : शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज कोसळल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. रुस्तुमा यशंवत शिंदे (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रुस्तुमा शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सुलदली बुद्रूक शिवारातील गट क्रमांक १६४ मध्ये शेतात हळद पिकाची काढणी सुरू होती. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व हलका पाऊस पडत होता. त्यामुळे हळदीचे नुकसान होऊ नये म्हणून रुस्तुमा शिंदे बुधवारी रात्री शेतात गेले होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते घराकडे परतत असताना अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या शेतकऱ्याने हा प्रकार पाहिला. त्याने गावकऱ्यांना व कुटुंबास माहिती दिल्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक झळके, उपनिरीक्षक नितीन लेनगुळे, तलाठी विजय जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.