कराड : कार्वे- कोडोली जुन्या रस्त्यावर कार्वे (ता. कराड) गावचे हद्दीतील थडगा नावाच्या शिवारात भूसुरूंग लावताना अधिकारी व ठेकेदाराने कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता, तसेच आजूबाजूच्या भागातील लोकांना सूचना न देता व स्फोट करताना सुरक्षा जाळीचा वापर न करता ब्लास्टिंग केल्याने त्यातील स्फोटातील दगड लागून दत्तात्रय पांडुरंग बामणे (वय ५५ रा. कार्वे, ता. कराड) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी घडली.
याबाबतची फिर्याद मृताचा मुलगा धीरज दत्तात्रय बामणे (२९, रा. कार्वे) याने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी वडगाव पेयजल योजनेचे संबंधित डेप्युटी इंजिनिअर शिरसाठ, ठेकेदार एस. एन. इंगवले व कर्मचारी यांच्यावर मंगळवारी गुन्हा नोंद झाला आहे.
याप्रकरणी याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कार्वे- कोडोली जुना रस्ता येथील थडगा नावाच्या शिवारात गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत वडगाव पेयजल योजनेच्या विहिरीचे काम चालू आहे. त्याठिकाणी खोदकाम करण्यासाठी सुरुंगाचा वापर करून अधूनमधून ब्लास्टिंग करण्यात येत असते. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे वडील दत्तात्रय बामणे हे त्यांच्या थडगे नावाच्या शिवारातील शेतात गेले होते. त्यांच्या शेताच्या जवळच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत वडगाव पेयजल योजनेच्या विहिरीचे काम सुरू होते.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विहीर खोदण्याकरिता ब्लास्टिंग करण्यात आले. त्यावेळी ब्लास्टिंगचा वेगाने आलेला दगड हा दत्तात्रय बामणे यांच्या पाठीवर उजव्या बाजूला जोराने लागल्याने त्यांच्या बरकड्या तुटून फुफ्फुसामध्ये रक्तस्राव झाला होता. त्यावेळी त्यांना तत्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी धीरज हा आपल्या मित्रांसमवेत वडिलांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेमधून घेऊन जात असताना पाचवड फाटा येथे गेल्यानंतर दत्तात्रय बामणे यांचे निधन झाले.
दरम्यान, धीरज बामणे याने भूसुरूंग करताना अधिकाऱ्याने व ठेकेदाराने कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता भूसुरूंग करताना आजूबाजूच्या भागातील लोकांना सूचना न देता तसेच स्फोट करताना सुरक्षा जाळीचा वापर न करता वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे. याप्रकरणी वडगाव पेयजल योजनेचे संबंधित प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी करीत आहेत.