सोलापूर : झटपट पैसा कमावून देण्याच्या आमिषाने दोघा भामट्यांनी करमाळा तालुक्यातील एका सधन शेतकऱ्याला ४० लाख रुपयांस गंडा घातल्याचा प्रकार घडला. या गुन्ह्याची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात झाली आहे. यासंदर्भात अशोक बाबू शेळके (वय ५०, रा. पुनवर, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि राहता येथील दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दोघांनी करमाळ्यात अशोक शेळके यांच्या ओळखीच्या माध्यमातून संपर्क साधून जवळीक वाढविली.
या दोघांनी ब्रिक्स कंपनीची आर्थिक गुंतवणूक योजना कशी लाभदायक आहे, याची माहिती दिली. बोलण्यातील प्रभाव, आत्मविश्वास पाहून शेळके हे या दोघांच्या जाळ्यात सहजपणे अडकले. झटपट पैसा कमावण्याच्या मोहातून ब्रिक्स कंपनीच्या गुंतवणूक योजनेत शेळके यांनी ४० लाखांची गुंतवणूक केली. ७ ऑक्टोबर २०२४ पासून हा प्रकार सुरू झाला. परंतु नंतर ठरल्याप्रमाणे गुंतवणुकीचा परतावा मिळाला नाही. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेळके यांनी संबंधितांशी वारंवार संपर्क साधून विचारणा केली. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शेवटी शेळके यांनी करमाळा पोलिसांत धाव घेतली. यात आणखी किती जणांची आर्थिक फसवणूक झाली, याची माहिती मिळाली नाही.