दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी खास भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी आणि गरजा जाणून घेतल्या. तसेच त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शंकरनारायणन यांनी प्रथमच या विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठातील विविध उपकरणे, कृषी उत्पादने आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. चिपळूणचे प्रगतिशील शेतकरी रणजित खानविलकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर गव्हे येथील शैला अमृते यांनी बचत गटाला कर्जाबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या, तर रमेश म्हात्रे यांनी जिताडा माशाचे बीज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. चिपळूणच्या वसंत उदेग यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या कंपनीची यंत्रसामग्री व बियाण्यासाठी अनुदान देण्यात यावे, अशी सूचना केली, तर पनवेलच्या शेतकऱ्यांनी गोडय़ा पाण्यातील मत्स्य शेतीमध्ये येणाऱ्या विविध अडचणींचा तपशील राज्यपालांपुढे सादर केला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी हे सर्व मुद्दे इंग्लिशमध्ये भाषांतरित करून राज्यपाल शंकरनारायणन यांना विशद केले. तसेच अन्य सूचना आणि मागण्या लेखी स्वरूपात विद्यापीठाकडे देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी जालगाव येथील अंगणवाडीला भेट देऊन तेथील चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. तसेच वळणे येथील समर्थ सहकारी काजूप्रक्रिया उद्योगाच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. त्यानंतर उर्वरित रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा रद्द करून के. शंकरनारायणन मुंबईला रवाना झाले.

Story img Loader