वाढत्या महागाईचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असतो. विरोधात असतानाही आणि सत्तेत आल्यावरही. पण, त्यापासून सामान्यांची सुटका मात्र होताना दिसत नाहीये. गेल्या दोन आठवड्यांत टोमॅटोच्या दरांनी केलेली शेकडोंची उड्डाणे सामान्यांना घायकुतीला आणण्यासाठी पुरेशी ठरली आहेत! कधी गॅस, कधी कांदे, कधी डाळींमुळे हवालदील होणारा सामान्य ग्राहक सध्या टोमॅटोमुळे मेटाकुटीला आला आहे. एकीकडे ग्राहकांची ही अवस्था असताना दुसरीकडे महाराष्ट्रात एका शेतकऱ्यानं टोमॅटोच्या विक्रीमुळे कोट्यवधींचा नफा कमावल्याचं समोर आलं आहे. यामुळे टोमॅटोच्या दरांमुळे सामान्यांना आर्थिक भार सोसावा लागत असला, तरी दुसरीकडे बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळत असल्याचीही भावना व्यक्त होत आहे.

दोनच दिवसांपूर्वी कर्नाटकच्या एका शेतकऱ्याला एका दिवसात ३८ लाखांचा नफा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या जुन्नर भागातील एका शेतकऱ्यानं गेल्या महिन्याभरात फक्त टोमॅटोच्या विक्रीतून सुमारे दीड कोटींचा नफा कमावल्याचं समोर आलं आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. जुन्नरमधील तुकाराम भागोजी गायकर या शेतकऱ्यानं त्याच्या १८ एकर जमिनीपैकी १२ एकरवर टोमॅटोची लागवड केली होती. गेल्या महिन्याभरात गायकर यांनी तब्बल १३ हजार टोमॅटो क्रेटची (२० किलो प्रतीक्रेट) विक्री केली असून त्यातून त्यांना दीड कोटींहून अधिक उत्पन्न मिळालं आहे.

टोमॅटोने बनवलं लखपती! शेतकऱ्याने एका दिवसात विकले ३८ लाखांचे टोमॅटो, म्हणाला, “खतं आणि कीटकनाशकांबद्दल…”

एका दिवसात ९०० क्रेटची विक्री!

गेल्या महिन्याभराचा हिशोब लावला असता गायकर यांनी नारायणगंजमधील बाजारसमितीमध्ये केलेल्या विक्रीतून त्यांना भरघोस नफा मिळाला. गेल्या महिन्यात गायकर यांनी १००० ते २४०० रुपये प्रतीक्रेट दराने टोमॅटोची विक्री केली. गायकर यांच्याप्रमाणेच जुन्नरमधील इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनीही अशाच प्रकारे उत्पन्न मिळवल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

सर्वाधिक दर २५०० रुपये प्रतीक्रेट

दरम्यान, जुन्नरच्या नारायणगंज बाजारपेठेत टोमॅटोच्या एका क्रेटसाठी सर्वाधिक किंमत २५०० रुपये इतकी आली आहे. त्यामुळे टोमॅटोचं उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस आल्याचं बोललं जात आहे.

Live Updates