वसंत मुंडे

जनावरांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी शिळी भाकर

शिरूरजवळील छावणीतील गहिनीनाथ सिरसाट हे अपंग शेतकरी चार जनावरे घेऊन दोन महिन्यांपासून छावणी मुक्कामी आहेत. त्यांचा गाव आठ किलोमीटरवर. त्यामुळे सकाळी सोबतच भाजी भाकरी आणायची, तीच दुपारी आणि रात्री खाऊन जनावरांसोबत राहायचे. उन्हामुळे भाकरी कडक होतात, भाजी खराब होते. मग कधी अर्धपोटी तर कधी फाकाच नशिबी.  ६०० छावण्यांमध्ये रात्रीच्या जेवण्याची भ्रांत. बहुतांशजण असेच उपाशी झोपतात किंवा शिळय़ा भाकरी खाऊन जगतात. अलीकडेच शांतीवन सामाजिक संस्थेचे  प्रमुख दीपक नागरगोजे यांनी काही छावण्यांमध्ये भोजन सुविधा उपलब्ध करून दिली आहे, पण आजही अनेक छावण्यांमध्ये जनावरांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे उपवास सुरू आहेत.

बीड जिल्ह्यत सहाशे चारा छावण्यांमध्ये जवळपास चार लाख जनावरे आश्रयाला आहेत. एका जनावरासाठी नव्वद रुपये प्रमाणे अनुदान दिले जात असल्याने जनावरांच्या चारा पाण्याची सोय झाली, पण गावापासून दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या छावणीत जनावरांबरोबरच्या  शेतकऱ्यांसाठी  सरकारकडून कोणतीच तरतूद नसल्याने पशुपालकांच्या पोटाची आबाळ झाली आहे. प्रत्येक शेतकरी दोनपेक्षा जास्त जनावरे घेऊन छावणीत आल्याने दिवसभरात त्यांना घरी जाता येत नाही. सकाळी गावाकडून शेतकरी एकत्रित जेवणाचे डब्बे आणतात. मात्र, रात्रीच्या जेवणाचा डब्बा येणे शक्य नसल्याने सकाळच्याच भाकरी खाऊन रात्र काढली जाते. पंचवीस एकर जमीन, एक लाख रुपये किमतीच्या म्हशी, बलजोडय़ा, गायीचे मालक असणाऱ्यांवर अशी दुर्दैवी वेळ आली आहे. प्रत्येक छावणीमध्ये पाचशेपेक्षा अधिक शेतकरी असल्यामुळे छावणी चालकालाही या शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे झेपणारे नाही. पालवण येथील राजेंद्र मस्के यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जेवणाची व्यवस्था केली. सामाजिक क्षेत्रात काम करणारे शांतीवनचे प्रमुख दीपक नागरगोजे यांनी शिरूर परिसरातील दहा छावण्यांमध्ये रात्रीचे जेवण सुरू करून जवळपास पाच हजार शेतकऱ्यांना आधार दिला आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन वैद्यकीय सूत्रांच्या सल्ल्यानुसार शांतीवन रात्री कडधान्याची भाजी आणि भात असा आहार देत आहे.

जनावरांबरोबर छावणीमध्ये मुक्कामी राहणारे शेतकरी कैलास खरमाटे यांच्याकडे पाच एकर शेती असली तरी पाणी आणि चाऱ्यामुळे जनावरे घेऊन ते महिनाभरापासून छावणीत आहेत. गावाकडून कधी दुचाकीवर भाकरी आणून दिल्या जातात. पण कोणी आले नाही तर इथल्याच शेतकऱ्यांच्या शिळ्या भाकरी खाऊन त्यांना रात्र काढावी लागते. हीच परिस्थिती बहुतांशी छावण्यांमध्ये आहे. मानूर येथील कलंदर पठाण यांच्या छावणीत जवळपास दोन हजार जनावरे आहेत.  शहाजानपूर येथील वीस एकर शेती असलेले भीमराव घुमरे हे सहा जनावरे घेऊन तळेगावच्या छावणीत पत्नी यमुनाबाई सोबत कोपीतच राहतात. बहुतांश शेतकऱ्यांची गावे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असल्याने सकाळी गावाकडे जाऊन दुपापर्यंत परततात. रात्री काही सोय नसल्यामुळे मिळेल ते खाऊन भागवतात.

एक लाख रुपये किमतीच्या म्हशी असणारे पंधरा ते पंचवीस एकपर्यंत शेती असणाऱ्या अनेकांना अर्धपोटी किंवा कधी उपाशीपोटी राहावे लागत आहे.

‘समाजातील दानशुरांकडून मदत मागून दररोज पाच हजार शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांवर दुर्दैवी वेळ आल्याने समाजातील मदतगारांनी पुढे आले पाहिजे.’

– दीपक नागरगोजे, शांतीवन संस्थेचे प्रमुख