गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टीने मारले, त्याच शेतकऱ्याला या वर्षी दुष्काळाने गाठले. हिंगोली तालुक्यातील पेडगाव वाडी येथील शेतकरी सदाशिव सावळे यांनी दोन्ही वर्षी पीक विमा काढला होता. एका वर्षी तर पीक विमा भरण्यासाठी त्याने व्याजानेही रक्कम घेतली होती. एकदाही विम्याची रक्कम न मिळाल्याने सावळे यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
खरीप हंगामात सिरसम बु. येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी पीक विमा भरला होता. पेरणी केल्यानंतर पिकांना संरक्षण मिळावे म्हणून सावकाराकडून १० टक्के व्याजाने त्याने रक्कम घेतली होती. पैसे तर मिळाले नाहीच, उलट या वेळी दुष्काळाने गाठले. त्यामुळे ते हैराण झाले आहेत. आता ही रक्कम मिळाली नाही तर आत्मदहन करू, असे त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. पीक विम्यातील त्रुटीबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्यातील दोष दूर करण्यासाठी समिती नेमली जाईल, असे आश्वासन औरंगाबाद येथे दिले होते. आता पीक विम्यातील नवनव्या अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. काही वेळी अतिवृष्टी, तर काही वेळा दुष्काळ यामुळे शेतकरी मात्र हैराण झाला आहे. खरेतर सोयाबीनसाठी संरक्षित रक्कम २९ हजार ४००, कापसाला २० हजार २००, उडदाला १२ हजार ५००, तुरीसाठी १७ हजार २०० रुपये संरक्षित रक्कम आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पीक हाती आले नाही. या वर्षी प्रशासनाने आणेवारी ५० पेक्षा कमी नोंदविली आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीमध्ये साडेचार एकर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली. परंतु अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आपण कर्जबाजारी झालो असून शासनाने ७९ हजार ३०० रुपयांची रक्कम १२ टक्के व्याजासह द्यावी, अन्यथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा सदाशिव सावळे यांनी दिला आहे.
पेडगावच्या शेतकऱ्याची विम्याने केली कोंडी
गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टीने मारले, त्याच शेतकऱ्याला या वर्षी दुष्काळाने गाठले. हिंगोली तालुक्यातील पेडगाव वाडी येथील शेतकरी सदाशिव सावळे यांनी दोन्ही वर्षी पीक विमा काढला होता. एका वर्षी तर पीक विमा भरण्यासाठी त्याने व्याजानेही रक्कम घेतली होती.
First published on: 02-12-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer in trouble for seed insurance