शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्यांचे दर्शन साहित्यात व्हावे. बाह्य़जीवनाचे दर्शन घडविणे बंद करावे, तरच शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांची सोडवणूक होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.
शेतकरी संघटनेच्या पहिल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विचारवंत संजय पानसे, गझलकार भीमराव पांचाळे व स्वागताध्यक्ष सरोज काशीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतीविषयक भाष्य करताना डॉ. वाघ म्हणाले की, शेतकऱ्यांचा म्हणावा असा एकही राजकीय पक्ष आज नाही. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्यानंतर शेतकऱ्यांचा असा एकही राजकीय नेता झाला नाही. कृषीप्रधान म्हटल्या जाणाऱ्या या देशात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प नाही. शेतीची तरतूद १६ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आली आहे. विदर्भातील शेतीला पाणी नाही. अशा स्थितीत शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार, असा सवाल डॉ. वाघ यांनी केला.
पूर्वीच्या साहित्यातही शेतकऱ्यांबाबत लिखाण झाले असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, ज्ञानेश्वरांनी अठराव्या अध्यायात एका ओळीतून भांडवलाचे मूळ भूमीत असल्याचे दाखवून दिले आहे. चक्रधरांच्या लिळांमध्ये शेतीचा उल्लेख येतो. महात्मा फु लेंनी तर शेतीचा सांगोपांग विचार मांडला. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही, हे संत तुकारामांनी लिहून ठेवले. संतांना जे उमगले ते नेत्यांना समजले नाही. मूळ प्रश्नाला बगल दिली जाते. पाणी आणि उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला तरच शेतकऱ्यांचे भले होईल. त्यासाठी कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन झाले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी उसावर प्रक्रिया करीत साखर विकली. त्यांच्या नेत्यांनी त्यासाठी कष्ट उपसले. आमचे नेते शाळा-महाविद्यालये काढत बसले. हा अभ्यास साहित्यात उमटायला हवा. शेतकऱ्यांचे बाह्य़दर्शन नव्हे, तर शेतीविषयक जाणिवा लेखणीतून प्रकट व्हाव्या. शेतकऱ्यांचे दु:ख, दुष्काळ, पूर, सावकारी या घडामोडींवर झालेले लिखाणच शेतकरी साहित्य म्हणता येईल. या साहित्यातूनच शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर प्रहार करणे शक्य होईल. धो धो पाऊस शहरी व्यक्तींना पर्यटनाचे सुख देतो, तर गावकऱ्यांना पिकांची हानी दाखवितो. हा फ रक लेखक डोळ्याने टिपणार काय, असा सवाल डॉ. वाघ यांनी केला.
फक्त एकमेकांची दु:खे सांगू नका -शरद जोशी
प्रकृ ती अस्वास्थ्यामुळे संघटना नेते शरद जोशी हे संमेलनास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी लिहून पाठविलेल्या अध्यक्षीय भाषणातून हे संमेलन एकमेकांची दु:खे सांगण्यापुरते मर्यादित न राहता संघटनेने फु लविलेल्या निखाऱ्यांवरील राख उडवून ते परत प्रज्वलित करण्याची हिंमत शेतकरी समाजात निर्माण करणारी ठरो, असा संदेश दिला.
शेतकऱ्यांच्या समस्यांना साहित्यात स्थान हवे
शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्यांचे दर्शन साहित्यात व्हावे. बाह्य़जीवनाचे दर्शन घडविणे बंद करावे, तरच शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांची सोडवणूक होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.
First published on: 02-03-2015 at 02:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer issues should be raised in literature