मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांचं अनुदान मान्य केलं. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली. सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कृषी सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून 5 एकराच्या आत शेती असलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि सातबारा ग्रामपंचायतीकडून मागवण्यात आला.
टेलकामठी येथील शेतकरी रमेश वाडीकर आणि गणेश वाडीकर हे दोघे भाऊ पात्र ठरले. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. मात्र जमीन क्षेत्र एक असल्याने दोघांकडे असलेला सातबारा वेगळा नाही. त्यामुळे या दोघांपैकी कोणत्या तरी एका भावाला या योजनेचा लाभ मिळणार होता. यासाठी दोन्ही भावांनी स्वतःचे बँक पासबुक खात्याची प्रत ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी जमा केली.
मात्र योजनेचा लाभ मीच घेणार या मुद्द्यावरून या दोघांमध्ये भांडण झाले. वाद एकाच भांडणावर थांबला नाही तर संध्याकाळीही या दोघांमध्ये वादावादी झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर लहान भाऊ गणेश वाडीकर याने त्याच्या मोठ्या भावावर म्हणजेच संतोष वाडीकरच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. यामुळे संतोष वाडीकर जखमी झाला. हा प्रकार पाहिलेल्या गावकऱ्यांनी तातडीने संतोषला सावनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केलं. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गणेश वाडीकरला अटक केली. गणेशला कोर्टातही हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.