स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक घेत आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. मात्र, यावर बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे. “राजू शेट्टी महान नेते, ते २८८ काय देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभेत उमेदवार उभे करू शकतात”, असा खोचक टोला रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींना लगावला आहे.

रविकांत तुपकर काय म्हणाले?

“राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही. बुलढाणा जिल्ह्यात फक्त २८ टक्के पीक कर्ज वाटप झालं आहे. मग पेरण्या झाल्यानंतर तुम्ही कर्ज देणार आहात का? कर्ज भरत असताना बँकावाले गोड बोलतात. मात्र, कर्ज देण्याची वेळ आल्यानंतर त्यामध्ये फाटे फोडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहतात”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

हेही वाचा : “दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान

शेतकऱ्यांचे सेविंगचे पैसे परस्पर खात्यात जमा करण्याचा सपाटा बँकांनी लावला आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. मग सरकार काय करतं? मुख्यमंत्री शिंदे काय करतात? रिझर्व बँक काय करती? केंद्रातील अर्थमंत्री काय करतात? हा प्रश्न आहे. पेरणी झाल्यानंतर पीक कर्जाचा फायदा काय? पीक कर्ज मुळात पेरणीसाठी मिळायला हवं. असा त्याचा हेतू असतो. मात्र, बँकांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे”, असा हल्लाबोल रविकांत तुपकर यांनी केला.

रविकांत तुपकरांची राजू शेट्टींवर टीका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली, त्यामध्ये विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत काय ठरलं? असा प्रश्न विचारण्यात आला असता रविकांत तुपकर म्हणाले, “मी बैठकीला नव्हतो. त्यामुळे बैठकीत काय ठरलं? याबाबत मला माहिती नाही. मला त्या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं. त्यामुळे काय ठरलं मला माहिती नाही. राजू शेट्टी महान नेते आहेत. ते २८८ काय देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभेला उमेदवार उभे करू शकतात. कारण त्यांची ताकद फार मोठी आहे”, असा खोचक टोला रविकांत तुपकर यांनी लगावला.

…तर पीक विमा कंपनीचं कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही

“मी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच कृषी सचिवांची भेट घेतली. त्यांच्या लक्षात आणून दिलं की आत्तापर्यंत पीक विमा मिळायला हवा होता. मात्र, पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे मी कृषीमंत्र्यांची भेट घेऊन सांगितलं की, पीक विमा मिळाला नाही तर पीक विमा कंपनीचं कार्यालय आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही. मात्र, त्यांनी आश्वासन दिलं आहे की, या आठवड्यात पीक विमा जमा करण्यास सुरुवात करू”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

Story img Loader