सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते स्वा. सैनिक व माजी आमदार जयानंद मठकर यांनी सार्वजनिक जीवनातून सेवानिवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठ महिन्यांत त्यांच्यावर दोन वेळा एन्जोप्लास्टी सर्जरी करणे अनिवार्य झाल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना काही काळ संपूर्ण विश्रांती (बेडरेस्ट) घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. तसेच काही काळ त्यांच्यावर बोलण्याची आणि फिरण्याची मनाई करण्यात आलेली आहे. अलीकडच्या काळात जयानंद मठकर हे सक्रिय राजकारणापासून अलिप्त असले तरी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, ग्रंथालय चळवळ आणि असंघटित कामगार आंदोलनात सक्रिय होते. अण्णा हजारे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संघटन उभे करण्याची जबाबदारी जयानंद मठकर यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार मागील दोन-तीन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यांतून भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या सभासदांची नोंदणी करून सर्व तालुक्यांतून भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाच्या समित्या स्थापन करण्याचे काम त्यांनी पूर्ण करून जिल्हा समितीची निवड केली होती. अशा प्रकारे दिलेली जबाबदारी पार पाडून सिंधुदुर्ग जिल्हा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन जिल्हा समितीच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा सादर केला होता. परंतु त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. अलीकडे अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन अधिक व्यापक आणि विस्तारित करण्याच्या उद्देशाने जिल्हा जिल्ह्य़ातून युवक आणि महिलांना या आंदोलनात सहभागी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जिल्ह्य़ांतून निमंत्रकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात या कार्यासाठी जयानंद मठकर यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु वैद्यकीय सल्ल्यानुसार ही जबाबदारी पार पाडणे शक्य नसल्याने त्यांनी निमंत्रकपदाचा राजीनामा आदरणीय अण्णा हजारे यांच्याकडे पाठविला आहे. या जिल्ह्य़ाच्या निमंत्रकपदासाठी जयानंद मठकर यांनी सावंतवाडी तालुका भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे विद्यमान अध्यक्ष राघवेंद्र जयंत बरेगार यांचे नाव सुचविले आहे. राघवेंद्र बरेगार हे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात गेली काही वर्षे सक्रिय असून, त्यांनी वनविभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्याचा भष्ट्राचार पुराव्यानिशी उघडकीस आणला आहे व त्याविरुद्ध उचित कार्यवाही होण्याच्या दृष्टीनेही ते क्रियाशील आहेत.

Story img Loader