बारामती येथे एक महिन्याने होणाऱ्या आगामी नाटय़संमेलनास नऊ माजी संमेलनाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तर, श्रीकांत मोघे आणि लालन सारंग या माजी संमेलनाध्यक्षांसह डॉ. मोहन आगाशे या विद्यमान संमेलनाध्यक्षांचाही नाटय़प्रयोग सादर होणार आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २२ ते २४ डिसेंबर या कालावधीत बारामती येथे नाटय़संमेलन होणार आहे. या संमेलनास नाटय़निर्माते राजाराम शिंदे आणि डॉ. बाळ भालेराव, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला शिलेदार आणि लालन सारंग, नाटककार सुरेश खरे आणि प्रा. दत्ता भगत, ज्येष्ठ गायक-अभिनेते रामदास कामत आणि श्रीकांत मोघे यांच्यासह नाटय़प्रशिक्षक राम जाधव हे नऊ माजी संमेलनाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या संमेलनाचे संयोजक आणि नाटय़ परिषदेच्या बारामती शाखेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे इच्छा असूनही नाटय़संमेलनास उपस्थित राहता येणार नसल्याचे कळविले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला उपस्थित राहता येणार नसल्याचे ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांनी स्पष्ट केले आहे. तर, नाना पाटेकर यांच्याशी संपर्क सुरू आहे. ते संमेलनास उपस्थित राहतील अशी आम्हाला आशा असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.
या संमेलनात श्रीकांत मोघे हे ‘मला उमजलेले पुलं’ आणि लालन सारंग यांची प्रमुख भूमिका असलेले ‘कालचक्र’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला डॉ. मोहन आगाशे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तीन संमेलनाध्यक्षांचे प्रयोग हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे. तर, डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या ‘शंभूराजे’ या प्रयोगाने नाटय़संमेलनाची सांगता होणार असल्याचे सांगून किरण गुजर म्हणाले, महेश टिळेकर निर्मित ‘मराठी तारका’ हा मराठी नायिकांचा सहभाग असलेला आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद निर्मित ‘मराठी संगीत रजनी’ हे दोन विशेष कार्यक्रम होणार आहेत. या खेरीज वामन केंद्रे दिग्दर्शित ‘पिया बावरी’ हा नाटय़शास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांंच्या भूमिका असलेला कार्यक्रम होणार आहे.    
संमेलनातील परिसंवाद
जुन्या नाटकांची निर्मिती : यशाची खात्री की अपयशाच्या भीतीतून सुटका : सहभाग – सुरेश खरे, उदय धुरत, आनंद पणशीकर, सुनील बर्वे, सुधीर भट, शफी नायकवडी, शेखर बेंद्रे
मराठी रंगभूमी : नव्या नाटकांच्या शोधात : सहभाग – वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, जयंत पवार, गिरीश जोशी, लता नार्वेकर, वंदना गुप्ते, प्रशांत दामले
मराठी नाटकातील स्त्रियांचे स्थान : सहभाग – खासदार सुप्रिया सुळे, भारती आचरेकर, स्मिता तळवलकर, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, डॉ. वि. भा. देशपांडे, प्रशांत दळवी.

Story img Loader