बिपीन देशपांडे
छत्रपती संभाजीनगर : सोयाबीनची उगवणच न होण्याचे दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात आढळून येणारे प्रकार आणि त्यापोटी द्यावी लागणारी भरपाईची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृषी विभागाकडून स्थानिक शेतकऱ्यांनाच ‘माझी शेती, माझे बियाणे’चा संदेश देण्याची मोहीम राबवली जात आहे. त्यात सोयाबीनचा ऐनवेळी तुटवडा भासणार नाही, यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडूनही (एफपीसी) बियाणे खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत असून अनेक कंपन्याही त्यासाठी सरसावल्या आहेत. मराठवाडय़ात २०० तर महाराष्ट्रात सहाशेंपेक्षा अधिक कंपन्या सध्या सोयाबीन बियाणे पुरवठय़ाचे काम करत आहेत.
महाराष्ट्रात सोयाबीनचे ४० लाख हेक्टरवर क्षेत्र आहे. लातूर हा सोयाबीनचे पीक सर्वाधिक घेणारा प्रमुख जिल्हा आहे. लातूर व धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या पट्टय़ांमध्ये मिळून २५ शेतकरी उत्पादक कंपन्या सध्या कार्यरत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे ग्राम परिवर्तन योजनेंतर्गत (स्मार्ट) ६० टक्के अनुदान तीन टप्प्यात प्राप्त होत असून त्याअंतर्गत कंपन्या सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करत आहेत. कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार देशात १५ हजार ९४८ शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी झाली आहे. एक लाख शेतकऱ्यांमागे सहा शेतकरी कंपन्यांची स्थापना झाली आहे. सुमारे ९२ टक्के शेतकरी कंपन्या या कृषी विषयक उद्योग व्यवसायात उतरल्या असूून २.४ टक्के कंपन्यांच्या महिला संचालक आहेत.
राहुरी, परभणी, अकोला येथील कृषी विद्यापीठातून तयार केलेले संशोधित वाण आणले जाते. वैयक्तिक पातळीवर त्याची लागवड करतो. कंपन्यांनी आठ ते दहा गावांचे कार्यक्षेत्र निवडले आहे. बाजारपेठेत परराज्यातील अनेक कंपन्या केवळ लेबल लावून बियाणे विक्रीच्या मोनोपॉलीविषयी मत परिवर्तन केले जाते आणि ते शेतकऱ्यांना पटत असल्यामुळे खरेदी केली जात आहे. – रमेश चिल्ले, निवृत्त कृषी अधिकारी तथा कंपनी संचालक.
शेतकऱ्यांना त्यांच्या पातळीवरच बियाणे साठवून, त्याचे परीक्षण करूनच पेरणी करण्यासाठीची एक मोहीम कृषी विभागाकडून राबवण्यात येत आहे. काही शेतकरी उत्पादक कंपन्या बियाण्यांची विक्री करण्यासाठी संपर्क साधत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. – विशाल साळवे, कृषी मंडळ अधिकारी, पैठण
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यात मुळातच सोयाबीनचा पेरा केवळ २८ हजार हेक्टरवर होते. एवढय़ा कमी क्षेत्रासाठी तीन कंपन्यांमार्फत होणारा सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा पुरेसा आहे. जिल्ह्यात कंपन्यांमार्फत बियाणे पुरवठा होत नाही. मात्र, शेजारच्या जिल्ह्यांसह लातूर आदी ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत बियाण्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. – प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.