ऊस दर आंदोलनाचा कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या उसाच्या पट्टय़ात सोमवारी भडका उडाला. या आंदोलनादरम्यान सांगली जिल्ह्य़ातील एक शेतकरी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. रस्त्यावरील वाहनांची हवा सोडत असताना टायरचा स्फोट होऊन एका आंदोलकाचा इंदापुरात मृत्यू झाला.
या वर्षीच्या गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल तीन हजार रुपये देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांचे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना इंदापूर येथे सोमवारी अटक केल्याने या आंदोलनाला सर्वत्र हिंसक वळण लागले.
सांगली जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये सोमवारी सकाळपासूनच आंदोलन सुरू झाले. वसगडे येथे आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. येथे बंदोबस्तावरील पोलीस एका खोलीत बसले होते. जमावाने अचानक या खोलीला बाहेरून कुलूप घालण्याचा प्रयत्न केला. जमाव हिंसक होण्याच्या शक्यतेने बाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये चंद्रकांत नलावडे हा शेतकरी जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजल्यावर वसगडेत पुन्हा तणाव निर्माण झाला. जमावाने चार दुचाकी वाहने व एक टँकर पेटवून दिला. जिल्ह्य़ात अन्यत्रही अशा घटना सुरू झाल्याने दुपारनंतर पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात सकाळपासूनच आंदोलनाने जोर धरलेला होता. प्रत्येक खेडेगावात आंदोलनासाठी शेतकरी रस्त्यांवर गटागटाने उतरले होते. कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली नाका ते तावडे हॉटेल हा सुमारे १ किलोमीटरचा परिसर हिंसक घटनांचे केंद्र बनला होता. या मार्गावरून जाणाऱ्या चार एसटी बसेस आंदोलकांनी पेटवून दिल्या. तसेच पोलिसांची व्हॅनही आंदोलकांनी जाळली. टायर पेटवून देण्याच्या प्रकारांना तर अक्षरश: ऊत आला होता. सुमारे चार तासांहून अधिक काळ आंदोलक हिंसक कारवाया करीत होते. पोलीस व शेतकरी यांच्यात समोरासमोर दगडफेक झाली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक जण जखमी झाले. सोलापूर जिल्ह्य़ातही ऊसदर प्रश्नावर टेंभुर्णी व करमाळय़ात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. माळशिरस, अकलूजमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या. सातारा जिल्ह्य़ातही आंदोलनाचे लोण वाढत चालले असून, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य वाहनांची मोडतोड करण्याचे प्रकार सुरू होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा