राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री आणि राजापूरचे सुपुत्र अ‍ॅड. लक्ष्मणराव रंगनाथ तथा भाईसाहेब हातणकर (८२) यांच्या पार्थिवावर तळगाव (ता. राजापूर) या त्यांच्या मूळगावी गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पालकमंत्री भास्कर जाधव, जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. गोरगरिबांचा कैवारी, स्वच्छ चारित्र्याचा, सर्वसामान्यांचा नेता हरपल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्य मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषविलेले अ‍ॅड. ल. रं. तथा भाईसाहेब हातणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून ढासळली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत बोरिवली येथे भार्गव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री १०.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी तळगाव येथे आणण्यात आले व सायंकाळी ४.३० वा. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजापूर तालुक्यावर शोककळा पसरली. शहरातील संपूर्ण बाजारपेठेसह गुरुवारचा आठवडा बाजारही तात्काळ बंद करण्यात आला. तर राजापूर व रत्नागिरी बार असोसिएशननेही दिवसभरातील कामकाज बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पालकमंत्री भास्कर जाधव, जिल्हाधिकारी राजीव जाधव, काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे, आमदार राजन साळवी व आमदार उदय सामंत, प्रांताधिकारी संतोष भिसे, नलिनी भुवड, शामराव पानवलकर, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष वासुदेव तुळसणकर, ब. वि. आघाडीचे सुरेश भायजे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुजित झिमण, माजी तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर, उपनगराध्यक्ष हनीफ काझी, मच्छीमार नेतेअमजद बोरकर, महिला आघाडीच्या अनामिका जाधव, शिक्षण सभापती दत्ता कदम यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची श्रद्धांजली
‘भाईसाहेब हातणकर यांच्या निधनाने कोकणातील एक कुशल संघटक आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व काँग्रेसने गमावले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री म्हणून काम करताना भाईसाहेबांनी सर्वसामान्यांना वेळोवेळी न्याय दिला.
गोरगरिबांचे आधारवड असलेल्या भाईसाहेबांचे व्यक्तिमत्त्व साऱ्यांसाठी आदर्शवत होते,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, तर पालकमंत्री भास्कर जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, खासदार डॉ. नीलेश राणे, माजी आमदार बाळ माने, प्रदेश प्रवक्ते हरीश रोगे, रत्नागिरी एज्यु. सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, अ‍ॅड. सुजित झिमण आदी मान्यवरांनीही भाईसाहेबांच्या निधनाने जिल्ह्य़ाची हानी झाली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Story img Loader