लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : शेतजमिनीची शासकीय मोजणी करण्यास हरकत घेऊन दोघा शेतकरी बंधुंवर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी दहा ते अकराजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाळे येथे घडली.

पुरूषोत्तम ऊर्फ खंडू दिगंबर बन्ने (वय ४०, रा. पत्र्याची तालीम, उत्तर कसबा, सोलापूर) असे खून झालेल्या शेतक-याचे नाव आहे. त्यांचे बंधू देवीदास बन्ने (वय ४२) हेसुध्दा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. यासंदर्भात जखमी देवीदास बन्ने यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शांतप्पा आडके, सागर आडके आणि बाळू आडके (रा. देगाव, सोलापूर) यांच्यासह त्यांच्या सात ते आठ साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आणखी वाचा-राज्यात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच – विश्वजित कदम

मृत पुरूषोत्तम ऊर्फ खंडू बन्ने व त्यांचे बंधू देवीदास बन्ने यांच्या मालकीची बाळे शिवारात शेतजमीन आहे. त्यांच्या शेतालगत आडके कुटुंबीयांची शेती आहे. परंतु शेतजमिनीच्या हद्दीवरून त्यांच्यात वाद होता. दरम्यान, हद्दीचा वाद मिटविण्यासाठी बन्ने बंधुंनी आपल्य शेतजमिनीची शासकीय मोजणी करून घेण्याचे ठरविले. त्यानुसार शेतात शासकीय यंत्रणेमार्फत शेतजमिनीची मोजणी सुरू असताना त्यास आडके कुटूंबीयांनी जोरदार हरकत घेतली. शेताची मोजणी करायची नाही. अन्यथा एकेकाला खलास करू, असे म्हणत आडके कुटुंबीयांसह त्यांच्या साथीदारांनी बन्ने बंधुंवर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला केला. यात पुरूषोत्तम ऊर्फ खंडू बन्ने यांचा मृत्यू झाला. तर देवीदास बन्ने हे गंभीर जखमी झाले.