जयगड-निवळी रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबतचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसताना, तसेच संबंधित जिंदाल कंपनीने ३० मीटर रुंदीच्या रस्त्याची मागणी केलेली असताना प्रशासनाने मात्र ६० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी आग्रह धरला आहे. प्रशासनाच्या अट्टहासामुळे कंपनीचे भले होणार असले तरी येथील शेतकरी-बागायतदार मात्र उद्ध्वस्त होणार आहेत, असे संघर्ष समितीचे नेते व प्रख्यात बागायतदार काका मुळ्ये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही तर भूसंपादन करण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोपून काढू आणि वेळप्रसंगी हा रस्ताच बंद करू, असा सणसणीत इशाराही त्यांनी या वेळी दिला.
जयगड-निवळी रस्त्याच्या चौपदरीकरणाचा वाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून गाजत आहे. या रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला आमदार उदय सामंत यांच्यासह प्रकाश कोकजे, बाळासाहेब माईंगडे, सुधाकर सुर्वे, श्रीकांत देसाई, आप्पा घाणेकर आदी उपस्थित होते. या रस्त्याची ४२ कि. मी. लांबी असून त्याची रुंदी ६० मीटर करावयाची म्हटल्यास सुमारे अडीच हजार शेतकरी बाधित होणार आहेत. यात ७५ घरे व दीड हजार आंबा कलमे तसेच शेकडो जंगली झाडांबरोबरच शेतीही उद्ध्वस्त होणार असल्याचे या वेळी मुळ्ये यांनी माहिती देताना सांगितले.
हा रस्ता नेमका किती मीटरचा हवा, हा प्रश्नही अद्याप गुलदस्त्यातच आहे, तसेच याबाबत शेतकऱ्यालाही विश्वासात घेतले जात नाही. हा रस्ता आजही जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर नसून सातबारा शेतकऱ्यांच्याच नावावर आहे. रस्त्याच्या मोजणीला सुरुवात केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला १०० मीटरवर मैलाचे दगड लावण्यात आले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे.
हा रस्ता जिंदाल कंपनीसाठी हवा असल्याचे सांगितले जात असताना तो ६० मीटरचा कशासाठी हवा, असा प्रश्न ग्रामस्थ विचारीत आहेत. शिवाय कंपनीने आपल्याला ३० मीटरचा रस्ता पुरेसा आहे, असे पत्र शासनालाच दिलेले आहे. ही वस्तुस्थिती असताना ६० मीटरचा अट्टहास कशासाठी, असा सवालही या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या मानेवर बसून जर हा रस्ता करण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर मात्र येथील शेतकरी गप्प बसणार नाहीत. रस्त्यामध्ये आडवे बांध घालून बंदिस्त करण्यात येईल, असा इशाराही मुळ्ये यांनी दिला. या वेळी त्यांनी अधिकारी व स्थानिक पुढारी यांच्यावरही घणाघाती टीका करून कंपनीने येथील अधिकारी व पुढाऱ्यांना विकत घेतले आहे, असा आरोपही मुळ्ये यांनी केला. या सर्वाची यादी व त्यांनी कंपनीकडून घेतलेली रक्कम याची माहिती लवकरच उघड करणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

Story img Loader