एरवी केवळ श्रीमंतांचे खाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खपली गव्हाच्या उत्पादनात यंदा मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने त्याचे दर सध्या निम्म्याने खाली आले असून, सर्वसाधारण गव्हापेक्षाही तो कमी दराने विकावा लागत आहे. देशपातळीवर खपली गव्हाचा दर हा सांगलीच्या बाजारावर निश्चित केला जातो. दोन महिन्यांपूर्वी ६० रुपये किलो असलेला हा गहू सध्या केवळ २२ रुपयांनी विकला जात आहे.

उत्पादन वाढून दर खाली उतरले तरी या गव्हाची मागणी ही ठरावीकच राहते. एकीकडे वाढलेले उत्पादन आणि दुसरीकडे मर्यादित मागणी यामुळे यंदा हा गहू सामान्यांच्या गव्हापेक्षा स्वस्त झाल्याचे आश्चर्यकारकरीत्या पाहण्यास मिळत आहे.

खपली गहू तयार होण्यासाठी साध्या गव्हापेक्षा जास्त कालावधी लागतो. तसेच त्याला पाणीही मुबलक लागते. दुसरीकडे याचे एकरी उत्पादन देखील साध्या गव्हापेक्षा कमी आहे. या साऱ्यामुळे अनेक शेतकरी खपलीपेक्षा साध्या गव्हाच्या उत्पादनाकडे वळतात. परंतु गेल्या वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने या गव्हाच्या उत्पादनासाठी पाण्याची सोय झाली. यामुळे त्याला मिळणाऱ्या दुप्पट दराच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात खपली गव्हाची लागवड केली. यामुळे परिणामी यंदा या गव्हाच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या सांगलीच्या बाजारात रोज सुमारे ४ ते ५ हजार पोती खपली गव्हाची आवक होत आहे. परंतु या तुलनेत त्याची मागणी मात्र स्थिर असल्याने बाजार दिवसामागे कोसळत आहे.

आर्थिक उलाढाल..

खपली गव्हाच्या उत्पादनासाठी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातील जमीन आणि हवामान पोषक मानले जाते. यामुळे देशभरात या भागातच हे पीक घेतले जाते. यामुळे या गव्हाची देशातील सर्वात मोठी बाजारपेठदेखील सांगलीत विस्तारली आहे. देशभरातील या गव्हाचे दर सांगलीतील बाजारावर निश्चित होते. दोन महिन्यांपूर्वी या गव्हाचा दर ६० रुपये होता. तो आता २२ वर आल्यामुळे देशभरातील या गव्हाच्या किंमतीवर विपरीत परिणाम  होणार आहे.

महत्त्व काय?  सर्वसाधारण गव्हापेक्षा खपली गहू अधिक सकस आणि पोषणमूल्य असलेले धान्य मानले जाते.  याचे बियाणे हे पारंपरिक पद्धतीने राखून ठेवत त्यापासून नवे उत्पादन घेतले जाते. कुठल्याही रासायनिक प्रक्रियेपासून दूर असणारा हा गहू सकस असला तरी पचनासाठी जड असतो. याचा वापर करणारे लोक मर्यादित आहेत. तरीही हा गहू महाग म्हणून ओळखला जातो.

गेल्या हंगामातील ३ लाख टन खपली गव्हाचा साठा सध्या विविध गोदामांत शिल्लक आहे. मागणीचे प्रमाण कमी असतानाच नवीन हंगामातील आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. सध्या खपली गव्हाचा सांगलीच्या घाऊक बाजारातील दर क्विंटलला १५०० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. गंमत अशी की याच काळात साधा गहू मात्र २६०० ते २९०० रुपये क्विंटलने खपत आहे. गव्हाच्या दरातील ही विचित्र स्थिती प्रथमच अनुभवास येत आहे.      – विवेक शेटे, धान्य बाजारातील व्यापारी

Story img Loader