सेंद्रिय कापसाच्या निर्यातीने शेतकऱ्यांचा फायदा
प्रबोध देशपांडे, अकोला</strong>
विदर्भातील कापूस आता युरोपीय देशातील थंड वातावरणात उपयोगी असलेल्या वस्त्रांची गरज भागवणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व युरोपातील संस्थांच्या पुढाकारातून विदर्भात सेंद्रिय कापसाचे उत्पादन करून तो निर्यात करण्यात येईल. त्यासाठी कृषी विद्यापीठ व संस्थांमध्ये करार झाला आहे. लांब धाग्याच्या सेंद्रिय कापसावर संशोधन करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल.
युरोपीय देशांमध्ये अतिशय थंड वातावरण असते. वर्षभरात सहा महिन्यांच्या कालावधीतच हवामानानुसार मका व इतर पिके घेतली जातात. कापसासाठी त्या देशांमधील वातावरण अनुकूल नाही. त्यामुळे तेथील वातावरणात उपयोगी कपडय़ांची मोठी मागणी आहे. विशेषत: त्यांना सेंद्रिय कापसापासून तयार झालेल्या कपडय़ांची आवश्यकता आहे. इतर देशांमधून त्यांना कापूस आयात करावा लागतो. विदर्भात कापसाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होते. विदर्भातील कापूस निर्यात होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी पुढाकार घेतला. त्या देशातील संस्थांनाही विदर्भातील कापूस पसंतीस उतरला. यासंदर्भात कृषी विद्यापीठ व स्वित्र्झलड येथील सी अॅन्ड ए फाऊंडेशनसह तीन संस्थांसोबत करार करण्यात आला. करारानुसार संशोधन, उच्च शिक्षण, पाण्याचा अधिकाधिक वापर व तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यात येणार आहे. पाच वर्षांचा हा करार असून, त्यातील दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पांतर्गत कृषी विद्यापीठाला ४० लाखांचे अनुदान देण्यात आले. प्रकल्पावर काम करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांना फेलोशिपही देण्यात आली. लांब धाग्याच्या सेंद्रिय कापसावर कृषी विद्यापीठात संशोधन सुरू आहे. त्यातून सेंद्रिय कापसाचे वाण विकसित करण्यात येईल. या कापसाच्या बीजोत्पादनानंतर उत्पादन घेण्यात येणार आहे. तो कापूस स्वित्र्झलडसह इतर युरोपीय देशांमध्ये पाठवला जाईल.
कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर सेंद्रिय कापूस पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रकल्पांतर्गत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी स्वित्र्झलडचा दौरा करून कार्यशाळेत मार्गदर्शन केले. नागपूर येथेही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा घेऊन विचारमंथन करण्यात आले. दर्जेदार सेंद्रिय कापसाची गरज लक्षात घेऊन आगामी काळात विदर्भात वाढीव उत्पादन घेतले जाईल. सेंद्रिय कापसाची युरोपीय देशात निर्यात होणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मोठा लाभ पडणार आहे.
भारतीय खाद्य संस्कृतीही रुजवणार
सेंद्रिय कापसासोबतच भारतीय खाद्य संस्कृतीही युरोपीय देशांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. पाश्चिमात्य देशातील खाद्यपदार्थ भारतात सहज मिळतात. मात्र, विदेशात भारतीय पदार्थ दुर्मीळ असतात. त्यामुळे आपली खाद्य संस्कृती त्या देशांमध्ये नेण्याचाही प्रयत्न आहे.
१० हजार शेतकऱ्यांचे जाळे
कृषी विद्यापीठाबरोबर करार केलेल्या संस्थांचे भारताच्या विविध राज्यातील दहा हजार शेतकऱ्यांचे जाळे आहे. संशोधित वाणातून उत्पादन घेतले जाईल. विदर्भातील शेतकऱ्यांना त्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सेंद्रिय कापसासाठी युरोपीय देशातील संस्थांबरोबर कृषी विद्यापीठाने करार केला. त्यावर गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. या प्रकल्पातून विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल.
– डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.