आठवडय़ापेक्षा अधिक काळ जिल्ह्य़ात सुरू असलेल्या गारपीट आणि पावसाने बुधवारी विश्रांती घेतली असली तरी डोळ्यांदेखत पिके उद्ध्वस्त झाल्याने तालुक्यातील कापडणे येथे एका युवा शेतकऱ्याने शेतातच विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ातही तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस झाला होता. त्यावेळी झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच मार्चच्या पहिल्या आठवडय़ात गारपीट आणि पावसाने धिंगाणा घातला. यामुळे पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांना हताशपणे पाहावे लागले. कापडणे येथील सतीश उर्फ लोटन भावराव पाटील (३५) या शेतकऱ्याने आपल्या चार बिघा शेतीत लावलेले टोमॅटो, मेथी आणि कोथिंबीर हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पीक काढणीला आले असताना नुकसान झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या पाटील यांनी बुधवारी सकाळी शेतात गेल्यावर विष पिऊन आत्महत्या केली.
पाटील यांनी कर्ज काढलेले होते. पीक हातातून गेल्यामुळे आता कर्ज फेडता येणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यानेच पाटील यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि दीड वर्षांचा एक मुलगा असा परिवार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा