कराड : केंद्र शासनाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांसाठी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी ९० दिवसांसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले, तरी अद्याप कुठेच सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाही. तर, व्यापाऱ्यांकडून ३ हजार ७०० ते ४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल भावाने सोयाबीन खरेदी सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत असून, ही लूटच सुरू असल्याच्या व्यथा शेतकरी मांडत आहे.
केंद्राने कृषिमूल्य आयोगामार्फत सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव निश्चित करून ९० दिवसांसाठी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर ताबडतोब कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपनिबंधक सहकारी संस्था कराड, तसेच कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीला १२ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन हमीभाव केंद्र सुरू करून, बाजार समिती आवार, तसेच तालुक्यातील परवानाधारक खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
हेही वाचा >>>रतन टाटा यांच्या निधनामूळे वरसोली गावावर शोककळा; जाणून घ्या काय होते रतन टाटांचे अलिबाग मधील वरसोली कनेक्शन
याची दखल घेऊन उपनिबंधकांनी २७ सप्टेंबरला शेती उत्पन्न बाजार समितीस आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीला खरेदी-विक्री करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने जप्त करावेत, तसेच जे परवानाधारक नसतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, असे आदेश दिले. या आदेशानंतर बाजार समितीने कराड तालुक्यातील जवळपास २३ व्यापाऱ्यांना कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली. मात्र, व्यापारी मनमानीपणे हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. तर, केंद्राचा कृषिमूल्य आयोगही निद्रितावस्थेत असल्याबद्दल शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
आर्थिक अडचणीतील व साठवणुकीसाठी वाव नसणाऱ्या शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापारी देईल, त्या भावाने सोयाबीन विकावे लागत आहे. त्यातून त्याच्या होणाऱ्या लुटीबद्दल शेतकरी संताप व्यक्त करीत असून, शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत.