जिंतूर आणि सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिंतूर तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार आहेत.
जिंतूर व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत नव्याने कर्जपुरवठा करण्यासंदर्भात श्री. भांबळे यांनी १३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. विनाविलंब कर्जपुरवठा करावा. बलजोडी, ठिबक सिंचन, शेतीपूरक व्यवसाय, खरीप व रब्बी पेरणीकरिता कर्ज राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत वितरित करावे, महाराष्ट्र बँकेकडील दत्तक असलेली गावे इंडिया आणि हैदराबाद बँकेला जोडावीत, या मागण्या भांबळे यांनी केल्या होत्या. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने सोमवारपासून जिंतूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. संपूर्ण वर्षभरात अतिवृष्टी आणि गारपीट झालेल्या अनेक गावांना शासकीय मदत मिळाली नाही. वंचित गावे आणि शेतकऱ्यांना नव्याने सव्र्हेक्षण करून मदतीचा हात द्यावा, याकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार भांबळे यांनी केला आहे. आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिंतूरचे तालुकाध्यक्ष शरद अंभोरे, सेलूचे दत्तराव पौळ, शौकत लाला, नानासाहेब राऊत, माऊली ताटे आदींनी केले आहे.

Story img Loader