यवतमाळ : २०१४पूर्वी केंद्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसप्रणीत संपुआच्या काळात महाराष्ट्रातील नेते कृषीमंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले जायचे मात्र, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हते, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता केला. यवतमाळ येथे बुधवारी आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते.
मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी इंडिया आघाडी व काँग्रेसवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या मदतीवरून त्यांनी शरद पवार यांना नाव न घेता लक्ष्य केले. ते म्हणाले, की जेव्हा दिल्लीत संपुआ सरकार होते, तेव्हा काय अवस्था होती? तेव्हा तर महाराष्ट्रातले नेते कृषीमंत्री (शरद पवार) होते. तेव्हा केंद्र सरकारने एक रुपया पाठवला तर गावात फक्त १५ पैसे पोहचत. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी रुपये जमा झाले. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. आता काँग्रेस शासन असते, तर २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी खाऊन टाकले असते, असा आरोप पंतप्रधानांनी केला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्यासह यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी उपस्थित होत्या.
हेही वाचा >>> “मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
१० वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात ‘चाय पे चर्चा’साठी आलो होतो. तेव्हा एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळाल्या होत्या. २०१९ मध्ये आलो तेव्हा एनडीएचे संख्याबळ ३५० हून अधिक झाले. आता २०२४ मध्ये नवीन विकास पर्वात आलो आहे. आता देशात एकच आवाज आहे, ‘अब की बार ४०० पार…’ विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रेल्वेमार्ग तयार झाला आहे. पूर्वी देशात १०० कुटुंबापैकी फक्त १५ कुटुंबांनाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत असे. आता १०० पैकी ७५ कुटुंबांना पाणी मिळते. आदिवासींसाठी विविध योजना राबवून त्यांना मदत केली जात आहे. महाराष्ट्रातील अनेक सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे. मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी आहे, असेही मोदी म्हणाले.
जनता आणि मोदी अतूट जोड : एकनाथ शिंदे
गेले दशक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुवर्णकाळ ठरले. मोदींनी देशाला आत्मनिर्भर करून आत्मसन्मान आणि आत्मविश्वास दिला. जनता आणि मोदी यांचा अतूट जोड तुटणार नाही. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होतील आणि देशात ४०० पार तर महाराष्ट्रात महायुती ४५चा आकडा पार करेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या मदतीमुळे महाराष्ट्रातील अनेक सिंचन योजना पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मेळाव्याला संबोधित केले.
देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी चार प्रधान घटक आहेत. गरीब, युवा, शेतकरी, महिला सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान