अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात पाण्याअभावी डाळिंबाची बाग सुकल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने पावणे दोन एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरवल्याची घटना समोर आली आहे. केलवड येथील सुभाष चांगदेव वाघे या शेतकऱ्याने डाळिंबाची बाग नष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुभाष वाघे यांच्या नावावर ७५ गुंठे क्षेत्र आहे. जवळपास दोन एकर शेती त्यांच्या नावावर आहे. या क्षेत्रात त्यांनी २० गुंठ्यांवर शेततळे बनविले आहे. या वर्षी तीव्र दुष्काळी परिस्थिती असल्याने केलवड भागात पिण्यासाठीच पाणी नाही. मग बागेसाठी पाणी कुठून आणायचे, अशी भीषण परिस्थिती आहे. सुरुवातीला वाघे यांनी टँकरद्वारे पाणी विकत घेतले. त्यांनी तब्बल ६० हजार रुपये पाण्यावर  खर्च केले. दररोज चार वेळा टँकरद्वारे पाणी आणायचे. मात्र, पावसासाठी अजून महिनाभराचा अवधी आहे.  पाण्यासाठी इतका खर्च परवडत नसल्याने वाघे यांच्या अडचणी वाढल्या. यात  भर म्हणजे केलवड येथील तलाठी यांनी त्यांच्या शेतात डाळिंबाचा बाग असतानाही त्यांचे शेतात सोयाबिन दाखविले. त्यामुळे त्यांना डाळिंबाचे अनुदान न येता, सोयाबिनचे तुटपुंजे अनुदान आले. या दोन्ही कारणांमुळे  दोन एकर डाळिंबाच्या बागेवर जेसीबी फिरविल्याचे सुभाष वाघे यांनी सांगितले.

तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे डाळिंबाच्या बागेवर पाने नाहीशी झाली होती. निव्वळ डाळिंबाच्या काड्याच शिल्लक राहिल्याने वाघे हतबल झाले आणि एक-एक डाळिंबाचे झाड त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.

तलाठ्याविरोधात नाराजी

शेतात डाळिंब असताना सोयाबिनचे अनुदान दिले. हा आपल्यावर अन्याय आहे. डाळिंबाचे अनुदान आले असते तर टँकर मार्फत पाणी टाकता आले असते. परंतु केलवडच्या तलाठी यांनी अन्याय केल्याचा आरोप  वाघे यांनी केला. तलाठीला आपण स्पॉट पाहाणी करून पंचनामा करा व आपल्याला डाळिंबाचे अनुदान मिळण्यास सहकार्य करा, अशी विनंती केली होती. परंतु डाळिंबाचे अनुदान संपले, सोयाबिनचे शिल्लक असल्याचे सांगितले. आपले वडिलांचे खाते बडोदा बँक साकुरी व जिल्हा बँक साकुरी येथे असताना त्यांच्या नावावरचे अनुदान राहात्याच्या स्टेट बँकेत वर्ग करण्यासाठी पाठविले. तेथे वडिलांचे खातेच नाही, आम्ही साकुरीच्या बँकांचे खाते नंबर दिले होते. आता वडिलांचे १५ दिवसांपूर्वी निधन झाले. ते अनुदान आपण कसे मिळविणार, असा प्रश्न वाघे यांनी उपस्थित केला. वरिष्ठ अधिकारी गरीब शेतकऱ्यांवर अन्यायच करतात. तलाठी यांच्या बाबतही त्यांनी तक्रार केली असून त्या वयस्करांना अरेरावी करतात. हा अन्याय असल्याचे  त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers destroy pomegranate farm in ahmednagar due to drought
Show comments