सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. त्याचाच भाग म्हणून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध करीत चक्क प्रांताधिकाऱ्यांसमोर लोटांगण घातले.बार्शीचे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी शक्तिपीठ मार्गासाठी जमिनी संपादन करण्याच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती. उपस्थित शेतकऱ्यांनी जमीन देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत बैठक उधळून लावली. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी पडदुणे यांच्यासमोर लोटांगण घालून शासन व प्रशासनाच्या कार्यवाहीचा निषेध नोंदविला. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, शेती आमची-हक्क आमचा, भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करू नका, अशा घोषणांनी बैठकीतील वातावरण तापले होते. त्यामुळे अखेर बैठकीतील चर्चा फिस्कटली.
सोलापूर जिल्ह्यात बार्शीसह उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर व सांगोला या पाच तालुक्यांतील १५६ किलोमीटर लांबीसाठी नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाकरिता जमिनी संपादित केल्या जात आहेत. एकट्या बार्शी तालुक्यातील गौडगाव, रुई, रातंजन, जवळगाव, मालेगाव, आंबेगाव, शेळगाव आर आदी गावांतील शेतकऱ्यांची ६५० एकर जमीन संपादित होणार आहे.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी लोकांची मागणी नसतानाही हा महामार्ग तयार करण्याचा अट्टाहास शासनाकडून होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून त्यांच्या जमिनी संपादित करणे, हे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग तयार करण्याच्या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. शासनाने आपला निर्णय कायम ठेवल्यास त्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.