सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कृषी औद्योगिक पशुपक्षीमत्स्य व्यवसाय व पर्यटन मेळाव्यातून आधुनिकतेची कास धरून शेतकऱ्यांनी शेतीतून दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
जेव्हा शेतकऱ्यांचे शेतीतून एक लाख दरडोई उत्पन्न होईल तेव्हाच शेतकरी सधन बनेल, असा दिलासा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्ग कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नारायण राणे बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी सिंधू कृषी औद्योगिक पशुपक्षीमत्स्य व्यवसाय व पर्यटन मेळाव्यात पर्यटनाची हवाई सफर घडविण्यात आली. हेलिकॉप्टरने हवाई सफर करण्यासाठी शुल्क ठेवण्यात आले. हवाई पर्यटनातून सिंधुदुर्गचे दर्शन घडविण्यात आले याचे नारायण राणे यांनी कौतुक केले.
प्रदर्शन हे मनोरंजनाचे साधन नव्हे, तर त्यातून प्रबोधन झाले पाहिजे. शेती, औद्योगिक पशू, पक्षी, मत्स्य व पर्यटन विकास व्यवसायाचे आधुनिक तंत्रज्ञान यातून जाणून घ्या आणि या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करून उत्पन्न वाढवा, असे आवाहनदेखील राणे यांनी केले.
शेतीशिवाय प्रगती नाही, हे युवा पिढीने या प्रदर्शनातून जाणून घ्यावे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर शेती विकास प्रक्रियेत तरुणांनी झोकून द्यावे. शेतीतून विविधांगी विकास साधण्यासाठी प्रयत्न केल्यास निश्चितच रोजगाराभिमुख शेती व्यवसाय निर्माण होईल, असे नारायण राणे म्हणाले.
कोकणात कोसळणाऱ्या पावसाचा शेतीसाठी उपयोग करावा, असे आवाहन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली. या सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा चालविली आहे आणि कोकणावरदेखील सूड उगवला आहे. त्यामुळे वर्षभर विकासच त्यांनी रोखल्याचा आरोपदेखील नारायण राणे यांनी केला.
या वेळी आमदार नितेश राणे, जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह व जिल्हा परिषद पदाधिकारी उपस्थित होते. कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या महोत्सव आयोजनाचे महत्त्व विशद केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सौ. नीलम राणे, आमदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राणे यांना भेट म्हणून घोस्टन जातीची गाय व वासरू भेट देण्यात आले. या महोत्सवामुळे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आधुनिकतेचे दर्शन घडले आहे.

Story img Loader