कराड : दूधविक्री लिटरला ७० रुपयांवर आणि याचा खरेदीदर ४० रुपये हे न परवडणारे आहे. दूध उत्पादक अनुषंगाने म्हैस व गायीवर हा अन्यायच असल्याने ‘लाडकी बहीण’प्रमाणे ‘लाडकी म्हैस’ योजना आणण्यासाठी १५ ऑगस्टला भव्य मोर्चा काढून शासनाला जाब विचारणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिला.
शेवाळे म्हणाले, शासकीय योजनांचे लाभार्थी होताना, शेतकऱ्यांसह महिला व अन्य घटकांचे प्रचंड हाल होत असून, त्यांची प्रशासनाकडून कुचेष्टाच सुरू आहे. लाभार्थ्यांची ‘गाढव मेलं ओझ्यानं अन् शिंगरू मेलं हेलपाट्यांन.’ अशी अवस्था झाल्याने त्याविरोधातही हे आंदोलन आहे.
हेही वाचा…राजापूर : मांजराचा पाठलाग करताना बिबट्या सांड पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली तरी सुद्धा प्रशासकीय कार्यालयांमध्ये विशेषतः शेतकरी, कष्टकरी, महिला व गोरगरिबांवर अन्याय सुरू आहे. प्रधानमंत्री किसान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा योजनांच्या कागदपत्रांसाठी लाभार्थींची प्रचंड परवड सुरू आहे. त्यात मिळायचे दीड- दोन हजार रुपये अन् त्याच्या हेलपाटेवारी जायचे चार हजार रुपये अशी दयनीय स्थिती आहे. याला विरोध करण्यासह दुधाला चांगला वाढीव दर मिळावा म्हणून राज्यात ‘लाडकी म्हैस योजना’ आणली जावी म्हणून सातारा जिल्हाधिकारी, कराड प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयावर १५ ऑगस्टला भव्य मोर्चा काढणार आहे. त्यात राष्ट्रीय समाज पक्ष व अन्य पक्ष, संघटनाही सहभागी होतील, असे गणेश शेवाळे यांनी या वेळी सांगितले.