गेली २७ वर्षे संयम दाखवूनही अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही. दुसरीकडे कालव्यांची कामे न झाल्याने हेच लाखो लिटर पाणी धरमतर खाडीतून समुद्रात सोडले जाते. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आंबा खोऱ्याच्या पाण्यासाठी तीनवीरा धरणाच्या जवळ सत्याग्रहाला सुरुवात केली आहे.
भिरा येथील जलविद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या पाण्यावर आंबा खोरे प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार होती. यातून उजवा तीर कालवा आणि डावा तीर कालवा अशा दोन कालव्यांची बांधणी केली जाणार होती. मात्र २७ वर्षांनंतरही डावा तीर कालवा अस्तित्वात येऊ शकला नाही. डावा तीर कालव्यामुळे अलिबाग, पेण आणि रोहा तालुक्यातील ४३ गावांतील ६६९९ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार होती. यात अलिबाग तालुक्यातील ४८२७ हेक्टरचा समावेश होता. पण जलसंपदा विभागाच्या उदासीनतेमुळे कालव्याचे काम झालेच नाही. ही बाब लक्षात घेऊन आता श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पासाठी धरण बांधायची गरज नाही, पाण्याची कमतरता नाही तरीदेखील कालव्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकला नाही. आंबा खोऱ्याचे पाणी शेतीला मिळाले पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांनी गेली पाच वर्षे संघर्ष केला आहे. २००७ मध्ये तब्बल २० दिवसांचे ठिय्या आंदोलन केले. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कालव्याच्या कामाचे पुन्हा अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश दिले. २००८ मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेऊन कालव्याचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. २००९ मध्ये अधीक्षक अभियंता ठाणे पाटबंधारे विभागाने जलसंपदा विभागाला अहवाल सादर केला. हा अहवाल सादर करून आज तीन वर्षे लोटली आहेत. मात्र तरीही कालव्याच्या कामाबाबत जलसंपदा विभागाने कोणतीच कारवाई केली नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्यांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. धरणाच्या पाण्यासाठी धरणावरच आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पेझारी चेक पोस्ट ते तीनवीरा धरण असा लॉँग मार्च काढून, धरणाच्या पाण्याचे पूजन करून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंबा खोऱ्याचे पाणी जोवर शेतीला मिळणार नाही आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर येणारे प्रकल्प रद्द होणार नाहीत तोवर हा सत्याग्रह सुरूच ठेवणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राज्य निमंत्रक सतीश लोंढे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा