दुष्काळी भागातील शेतक-यांना केवळ कर्जमाफी नाही, तर पुढील हंगामाकरिता शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी आज (सोमवार) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली. दुष्काळी परिस्थितीमुळे मोसंबीच्या बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचा फटका पुढील अनेक वर्षे शेतक-यांना बसणार आहे, त्यामुळे केवळ आत्तापर्यंतच्याच कर्जाची माफी मिळून उपयोग नाही. तर पुढील हंगामासाठी शून्य व्याजदराने कर्ज, मोफत बियाणे याचा पुरवठा सरकारने करणे आवश्यक असून, ठिबक सिंचनासाठी सरकारने शंभर टक्के अनुदान दिले पाहिजे, असे सिंह म्हणाले. तसेच दुष्काळाने होरपळणा-या शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी सरकार जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही, अशी घोषणा राजनाथ सिंह यांनी केली. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ते महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत, त्यावेळी ते बोलत होते. गोपीनाथ मुंडे, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, खासदार रावसाहेब डांगवे हे भाजप नेतेही त्यांच्यासोबत या दौ-यात सहभागी झाले होते.
राजनाथ सिंह यांनी पिंपरीराजा (तालुका औरंगाबाद) येथील जनावरांची छावणी व अन्य भागात फिरून दुष्काळी परिसराची पाहणी केली. पाण्याअभावी जळून गेलेल्या मोसंबीच्या बागांचे झालेले नुकसान, पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट, आणि टॅंकरच्या पाण्यासाठी जनतेला कशाप्रकारे झगडा करावा लागत आहे, आदी परिस्थितीची माहिती सिंह यांनी घेतली. शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर शेतक-यांना केवळ कर्जमाफी नाही तर पुढील हंगामाकरीत शून्य व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी राजनाथ सिंह यांनी केली.
दुष्काळी शेतक-यांना दिलासा मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि दुष्काळ निवारणासाठी सरकारवर दबाव आणला जाईल, असं सिंह म्हणाले. दुष्काळ निवारणासाठी निधीपेक्षा सरकारच्या इच्छाशक्तीची अधिक आवश्यकता असून, तीच सरकारकडे नाही असा आरोपही राजनाथ सिंह यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा