पाण्यासह मजुरांची टंचाई आणि बिबटय़ाच्या भीतीवर नवा तोडगा

अनिकेत साठे, नाशिक

दुष्काळामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवत आहे. जिथे विहिरीत जेमतेम पाणी आहे, तेथील शेतकरी उन्हाळ्यात फळबागांसह अन्य पिके कसे जगविता येतील, या तयारीला लागले आहेत. पण त्यांच्यासमोर आणखी एक भीतीयुक्त प्रश्न आहे. बिबटय़ाचा मुक्त संचार आणि हल्ल्यांचा. रात्रीच वीज पुरवठा होत असल्याने शेतात अंधारात जाऊन पाणी सोडावे लागते. पाण्याचे दुर्भिक्ष आणि बिबटय़ाची दहशत शेतकऱ्यांना आता स्वयंचलीत ठिबक सिंचनकडे नेत आहे.

पाण्याअभावी अनेक प्रश्न भेडसावत असताना त्याचा नियोजनपूर्वक वापर करण्याची संकल्पना दृढ होत आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये निम्मे तालुके दुष्काळात होरपळत आहेत. पावसाअभावी शेतीचे गणित विस्कटले. ज्या भागात काहीअंशी पाणी शिल्लक आहे, तिथे त्याच्या काटेकोर वापरावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे येथे अलिकडेच आयोजित कृषी प्रदर्शनात अधोरेखीत झाले. शेकडो शेतकऱ्यांनी ठिबक उत्पादक, पुरवठादारांकडून ठिबक, त्यातही स्वयंचलीत यंत्रणेची माहिती घेतली. काहींनी जागेवर नोंदणी देखील केली. दुष्काळी स्थिती, मजुरांचा तुटवडा, काही भागात बिबटय़ाची धास्ती यामुळे शेतकरी या प्रणालीकडे वळू लागल्या उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी सांगितले.  स्वयंचलीत पध्दतीने प्रत्येक पिकास गरजेइतकेच पाणी किंवा खत मोजून मापून दिले जाते. कृषिपंप सुरू अथवा बंद करण्यास शेतात जावे लागत नाही. जल वाहिन्यांची सफाई आपोआप होते. यंत्रणेचे काम घरबसल्या नियंत्रित करता येते. निफाड तालुक्यातील गणेश कातकाडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी यंत्रणेची कार्यपध्दती समजावून घेतली. यंदा पाण्याची कमतरता आहे. शिवाय बिबटय़ाची धास्ती आहे. शेतातील कामासाठी मजूर मिळत नाही. तिन्ही प्रश्नांवर ही यंत्रणा तोडगा ठरू शकते, असे कातकाडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पाणी बचतीसाठी राज्य सरकार ठिबक सिंचनासाठी अनुदान योजना राबवून प्रोत्साहन देते. या योजनेसाठी या वर्षांत आतापर्यंत साडेसहा हजारहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यातील पाच हजार ८०० प्रस्तावांना पूर्वसंमती देण्यात आली.

उपलब्ध पाण्याचा योग्य पध्दतीने वापर व्हावा म्हणून शेतकऱ्यांचा ठिबककडे कल वाढल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी सांगितले.

प्रादेशिक वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांच्या मते शेतकऱ्यांनी ही पध्दती स्वीकारण्यामागे बिबटय़ाची धास्ती हे एकमेव कारण नाही. जिल्ह्य़ात १५ तालुके आहेत.

बिबटय़ाच्या संचाराच्या घटना निफाडमधील गोदा काठावरील गावे, दिंडोरी, नाशिक, सिन्नरमधील काही भाग अशा काही निवडक तालुक्यांत अधिक्याने आढळतात. उसासह अन्य शेतांमध्ये भ्रमंती करणारा हा प्राणी माळरान उजाड होऊ लागल्याने दृष्टीपथास पडतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

द्राक्ष, डाळिंबासह अन्य फळबागांसाठी ९० टक्के ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. आता इतर पिकांसाठी त्याचा वापर होत आहे.

बिबटय़ांचा मुक्त संचार असणाऱ्या निफाड, दिंडोरी, सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा हा नवा मार्ग स्वीकारला आहे.

बिबटय़ाची धास्ती

मागील काही वर्षांत दिंडोरी, निफाड तालुक्यात बिबटय़ाचे हल्ले वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी दिंडोरीमध्ये बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. निफाडमध्येही मागील काही वर्षांत असे प्रकार घडलेले आहेत. या एकाच तालुक्यात ११ महिन्यांत पशुधनावर ५७ हल्ले झाल्याची नोंद आहे. दिंडोरी तालुक्यात बिबटय़ाची दहशत आहे.

उन्हाळ्यात भीषणपाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. शेतीला रात्रीच वीजपुरवठा केला जातो. प्रवाही पध्दतीने पिकांना पाणी देताना अंधारात शेतात थांबावे लागते. बिबटय़ाच्या संचारामुळे गोदाकाठावरील गावांमध्ये भीतीचे सावट आहे. स्वयंचलीत ठिबक पध्दतीने शेतात थांबावे लागत नाही. पाण्याची बचत होते.

      – शिवम कुटे (शेतकरी, सायखेडा)

Story img Loader