हिंगोली : शक्तिपीठ महामार्ग उभा करण्यासाठी खडकाचा प्रकार आणि मातीचे परीक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘मोनार्क कंपनी’च्या यंत्रांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी हुसकावून लावले. ही यंत्रे गावात घेऊन जाण्यासाठी महसूल यंत्रणेतील अधिकारीही आले होते, त्यांनाही शेतकऱ्यांनी रोखले. ही घटना डोंगरकडा, तसेच सुकळी या गावांत घडली.
जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाची आवश्यकता नसताना तो राबवला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास अधिक चालना देण्यासाठी दौरे सुरू केले आहेत. त्यांनी या घटनेची नोंद घेऊन शेतकऱ्यांवर बळजबरी करता येणार नाही, ती करू देणार नाही, असे म्हटले आहे.
कळमनुरी शिवारात माती परीक्षणासाठी यंत्रचालकाबरोबर गेलेले मंडल अधिकारी प्रेमचंद चव्हाण म्हणाले, ‘आम्ही यंत्र घेऊन गेलो होतो. पण शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे काम करू शकलो नाही.’
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनी अधिग्रहित होतील, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, सरकारला या आश्वासनाचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांची जमीन वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाईची तयारी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांबरोबर सर्व प्रकारच्या लढ्यात पूर्ण शक्तीने उतरू, असे शेट्टी यांनी गुरुवारी जाहीर केले.