कर्जत : नाफेडने राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र बंद केली आहेत यावर रोहित पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली आहे. एवढे बहुमत मिळाल्यावर ही शेतकऱ्यांना मात्र नुकसान सहन करावे लागत आहे.
यावेळी रोहित पवार म्हणाले की, दीड महिन्यापूर्वीच नाफेडने केंद्र सुरू केले आहेत असे सांगितले. मात्र सोयाबीन ठेवण्यासाठी बॅगा नाहीत असे फालतू कारण सांगून खरेदी केली नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार रुपये एवढ्या कमी दारामध्ये सोयाबीन विकावे लागत आहे. सोयाबीन उत्पादकांना यावर्षी देखील २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार असून तूर उत्पादक शेतकऱ्यांना देखील तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. असे रोहित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांची सोयाबीन तसेच सर्वच पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होते. याचे प्रमुख कारण शेतकऱ्यांची हित समजणारे शरद पवार व उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस पक्षाचे नेते यांची सत्ता राज्यामध्ये होती यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. सध्या जे सरकार सत्तेवर आहे ते एकाच व्यक्तीच्या हातामध्ये आहे. अनेक मंत्र्यांना अजूनही साधे पीएस देखील मिळालेले नाही. यामुळे जनता शेतकरी भाजप सरकारचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी घेत आहेत अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.